१५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण : ज्येष्ठ नागरिक अनिल मसुरकर यांचा इशारा
मालवण : कालावल खाडीपात्रातील बेकायदेशीर होत असलेल्या वाळू उत्खननच्या विरोधात ज्येष्ठ नागरिक अनिल मसुरकर यांनी १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदन पत्राच्या माध्यमातून दिला आहे. यााबबत मसुरकर यांनी लोकआयुक्त, पालकमंत्री यांनाही निवेदन देऊन आपल्या उपोषणाबद्दल लक्ष वेधले आहे. मसुरकर यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, कालावल खाडीतील वाळू लिलाव ९ जून रोजी समाप्त झाले असतानाही कालावल खाडीत राजरोसपणे दिवस-रात्र अनधिकृत वाळू उत्खनन सुरू आहे. खाडी पात्रात वाळू उत्खनन सुरू असतानाचे जिओ टॅग असलेले फोटो कॉपी जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आलेली आहे. अनधिकृत वाळू उत्खनन थांबावे, यासाठी कोणत्तीही कार्यवाही आपल्याकडून न झाल्याने मी वयोवृद्ध असून सुद्धा नाइलाजाने १५ ऑगस्ट रोजी आपल्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत उपोषणास बसणार आहे
कालावल खाडीपात्रातील वाळू लिलाव ९ जून रोजी समाप्त झाले असताना सध्या बेकायदेशीर वाळू उत्खनन व वाहतूक बिनधास्तपणे सुरू आहे. शेकडो डंपर मालवण आचरा मार्गावरून वाहतूक करत आहेत. यामुळे रस्त्याचीही चाळण झालेली आहे. बेकायदेशीर वाळूचे डंपर वाहतूक होत असताना त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने त्यांना नेमका आशीर्वाद कोणाचा आहे, असा सवाल उपस्थित केला आहे.

