पर्यावरण संवर्धनासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा
सिंधुदुर्ग : पर्यावरण संवर्धन, निसर्गाचे संरक्षण आणि हवामान बदलाच्या आव्हानांवर प्रभावी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने ‘युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेच्या वतीने सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांच्याशी पर्यावरणविषयक विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान पर्यावरण संरक्षणासाठी युवकांचा सक्रिय सहभाग वाढविणे, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, स्वच्छता अभियान, प्लास्टिकचा वापर कमी करणे, जैवविविधतेचे जतन तसेच हवामान बदलाबाबत जनजागृती करण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेले समृद्ध निसर्गवैभव, समुद्रकिनारे, खाड्या, कांदळवने आणि जैवविविधता यांचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे. यासाठी प्रशासन, सामाजिक संस्था, युवक आणि नागरिक यांनी एकत्रितपणे काम करून पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला बळ द्यावे, यावर भर देण्यात आला.
युवकांच्या पुढाकारातून पर्यावरणविषयक जनजागृती निर्माण करणे, विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविणे आणि शाश्वत विकासाला चालना देणे, या अनुषंगाने ही चर्चा महत्त्वपूर्ण ठरली. या वेळी ‘युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’चे संस्थापक अध्यक्ष मेगल डिसोझा, उपाध्यक्ष स्वाती पारकर, सचिव ॲड. ऐश्वर्य मांजरेकर, सदस्य दर्शन वेंगुर्लेकर आणि सदस्य राहुल जाधव उपस्थित होते.
“पर्यावरणाचे संरक्षण ही केवळ एका संस्थेची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे. युवकांच्या सहभागातून पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करणे आवश्यक आहे,” हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार
