हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने ७ नोव्हेंबरला मालवण भरड नाका येथे आयोजन
विजेत्यांना आकर्षक चषक, रोख बक्षिसे व प्रमाणपत्र
मालवण | प्रतिनिधी : हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती, मालवण यांच्या वतीने शनिवार ७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता मालवण येथील भरड नाका येथे भव्य स्वरूपात ‘भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. ‘जयजयकार श्रीकृष्णाचा, वधी नरकासुराचा...’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत भगवान श्रीकृष्णाच्या विविध रूपांचे दर्शन घडणार असून, मुलांसह पुरुष व महिला यानी हे स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय संस्कृती, धार्मिक परंपरा आणि भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंगांची ओळख जागृत राहून ती नव्या पिढीला व्हावी, तसेच पारंपरिक वेशभूषेला व कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती, मालवण यांच्या वतीने नियोजन बैठकीत कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यात आली. भाऊ सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत राजू बिडये, बंटी केनवडेकर, अनिकेत फाटक, हरेश पडते, अमित खोत, प्रशांत हिंदळेकर यांसह अन्य सदस्य उपस्थित होते.
दोन गटांत स्पर्धा ; विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके
स्पर्धा दोन गटांत आयोजित करण्यात आली असून, पहिला गट बालवाडी ते पाचवीपर्यंतच्या मुलांसाठी, तर दुसरा खुला गट महिला व पुरुषांसाठी असणार आहे. लहान गटातील प्रथम क्रमांक विजेत्यास ३ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास २ हजार रुपये, तृतीय क्रमांकास १ हजार ५०० रुपये, तर पाच उत्तेजनार्थ विजेत्यांना प्रत्येकी ५०० रुपये अशी पारितोषिके तसेच आकर्षक चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
खुल्या गटात प्रथम क्रमांकासाठी ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३ हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी २ हजार रुपये, तर दोन उत्तेजनार्थ विजेत्यांना प्रत्येकी १ हजार रुपये अशी आकर्षक रोख पारितोषिके तसेच तसेच आकर्षक चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंगांचे सादरीकरण
स्पर्धकांनी भगवान श्रीकृष्णाची वेशभूषा परिधान करणे आवश्यक आहे. तसेच बालगट व खुल्या गटातील स्पर्धकांना जास्तीत जास्त एक ते दोन मिनिटांत श्रीकृष्णाच्या जीवनातील एखादा प्रसंग सादर करावा लागणार आहे. यामध्ये राधाकृष्ण, कृष्ण-सुदामा, गोवर्धन पर्वत, कालियामर्दन, श्रीकृष्ण जन्म, कंसवध यांसारख्या विविध प्रसंगांची निवड करता येणार आहे. सादरीकरणासाठी एक किंवा दोन पात्रांचा सहभाग असला तरी चालणार आहे.
स्पर्धेतील वेशभूषा, साहित्य आणि सादरीकरणाची तयारी स्पर्धकांनी स्वतः करावयाची आहे. स्पर्धकांच्या कलागुणांना वाव देतानाच त्यांच्या कल्पकतेला प्रोत्साहन देण्याचा समितीचा प्रयत्न आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
स्पर्धेसाठी नावनोंदणी व अधिक माहितीसाठी बंटी केनवडेकर (मो. ९४२२५९६६८२) आणि अमित खोत (मो. ९४०४४५७७८८) यांच्याशी संपर्क साधावा. मालवण शहरासह तालुक्यातील लहान मुले बालगोपाळ, महिला व पुरुषांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सांस्कृतिक सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती, मालवणच्या वतीने करण्यात आले आहे.
धार्मिक परंपरेसोबत कलागुणांना प्रोत्साहन
या स्पर्धेच्या माध्यमातून मालवणच्या सांस्कृतिक वैभवात भर पडणार असून, भगवान श्रीकृष्णाच्या बाललीला, पराक्रम आणि भक्तिमय प्रसंगांचे मनोहारी दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे. पारंपरिक वेशभूषा, आकर्षक सादरीकरण आणि धार्मिक-सांस्कृतिक वातावरणामुळे हा सोहळा विशेष आकर्षण ठरणार आहे. बालगोपाळांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच धार्मिक परंपरेचे जतन आणि नव्या पिढीमध्ये संस्कारांची रुजवणूक करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा
या स्पर्धेचे संयोजक म्हणून श्री. अमित खोत, तर सहसंयोजक म्हणून श्री. भाऊ सामंत काम पाहत आहेत. हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती, मालवणच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुलांसह पुरुष व महिला यानी हे स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा!
