धार्मिक परंपरा जपत महिलांचा विशेष सन्मान सोहळा
पोयरे गादववाडी येथे ललिता पंचमी उत्साही वातावरणात संपन्न
मंगेश नलावडे | मालवण : देवगड तालुक्यातील पोयरे येथील गादववाडीमध्ये उद्योजक तथा मालवणचे माजी उपनगराध्यक्ष राजन सरमळकर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने ललिता पंचमी सोहळा भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला. धार्मिक परंपरेचे जतन करतानाच सामाजिक बांधिलकी, ग्रामस्थांशी जपलेले जिव्हाळ्याचे नाते आणि समाजोपयोगी कार्यातून राजन सरमळकर यांनी परिसरात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मूळ मालवण येथील राजन राजन सरमळकर गेल्या काही वर्षापासून पोयरे गादववाडी येथे आंबा काजु बाग व्यवसायातून येथे जोडले गेले आहेत. येथे विस्तीर्ण आंबा-काजू बाग असून त्याठिकाणी निसर्गरम्य परिसरात हा धार्मिक सोहळा आयोजित करण्यात येतो. यावर्षी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आयोजित कार्यक्रमात देवस्थानातील अभिषेक, विधिवत पूजन, ब्राह्मण भोजन आणि महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी गावातील महिलांना साडी व श्रीफळ देऊन विशेष सन्मानित करण्यात आले. धार्मिक श्रद्धेला सामाजिक जाणीवेची जोड देणाऱ्या या उपक्रमामुळे सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
पोयरे गादववाडी परिसरातील देवस्थानांशी सरमळकर कुटुंबाचे अनेक वर्षांपासून श्रद्धेचे नाते आहे. निसर्गरम्य वातावरणातील पुरातन गुहा, कायम पाण्याने भरलेली आसरा देवीची तळी आणि औदुंबर वृक्षाशी संबंधित देवस्थान यांमुळे या परिसराला धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व लाभले आहे. ललिता पंचमीच्या निमित्ताने येथे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
ब्राह्मण भोजन, महाप्रसाद आणि ग्रामस्थांचा सहभाग यांमधून या सोहळ्याला सामूहिक स्वरूप प्राप्त होते. महिलांचा सन्मान करण्याची परंपरा जपत राजन सरमळकर यांच्या कुटुंबीयांकडून यावर्षीही महिलांना साडी व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. धार्मिक कार्यक्रम हा केवळ पूजाविधीपुरता मर्यादित न राहता गावातील लोकांना एकत्र आणणारा आणि परस्परांतील स्नेह वृद्धिंगत करणारा उपक्रम ठरत आहे.
यावेळी रोहित भोवर, क्षमा भोवर, जुई साळगावकर, अक्षता सरमळकर, प्रतिभा सरमळकर, प्रणाली साळगावकर, अमर सरमळकर, प्रशांत धोड, पुमन कृष्ण परब, प्रकाश माळकर, रवींद्र रुपये, नामु धुरी, अंकुश रुपये, गोपाळ रुपये, रसिका रुपये, सोनाली धुरी, मनीषा धुरी, प्रगती रुपये , शीतल रुपये यांच्यासह ग्रामस्थ, सरमळकर कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थित होते. सर्वांच्या सहभागातून धार्मिक विधी आणि महाप्रसादाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
पोयरे गादववाडी येथे सुमारे १०० लोकवस्ती असून, या भागातील ग्रामस्थांना रस्त्याच्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. ही अडचण लक्षात घेऊन राजन सरमळकर यांनी पुढाकार घेत सुमारे ५०० मीटर लांबीचा आणि १८ फूट रुंदीचा रस्ता तयार करण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून दिली.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रस्त्याची नोंद झाल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी या रस्त्यासाठी १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली.
आंबा-काजू बागायती व्यवसायाच्या निमित्ताने राजन सरमळकर यांचे देवगड तालुक्यातील पोयरे गादववाडीशी गेल्या ३७ वर्षांपासून नाते जोडले गेले आहे. या दीर्घ सहवासातून त्यांनी परिसरातील ग्रामस्थांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले आहेत.
येथील अनेक कुटुंबांना स्वतःची घरे उभारता यावीत, यासाठी आवश्यक असलेली जमीन त्यांनी मोफत उपलब्ध करून दिली. त्यामुळे अनेक कुटुंबांना हक्काची घरे उभारणे शक्य झाले. केवळ व्यावसायिक संबंध न ठेवता स्थानिक नागरिकांच्या अडचणी समजून घेणे, त्यांच्या गरजांच्या वेळी मदतीचा हात पुढे करणे आणि त्यांच्याशी कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाते जपणे, हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे.
घरासाठी जागा उपलब्ध करून देण्यापासून ते गावाच्या रस्त्यासाठी जागा देण्यापर्यंतच्या त्यांच्या योगदानातून सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव दिसून येते. स्वतःच्या प्रगतीसोबतच आपल्या सहवासातील कुटुंबांचाही विकास व्हावा, ही भूमिका त्यांच्या कार्यातून अधोरेखित होते.
राणे साहेबांच्या शिकवणीतून जनसेवेचा वसा
“जनतेची सेवा हेच आपले पहिले कर्तव्य असले पाहिजे,” ही खासदार नारायण राणे साहेब यांची शिकवण आपण जपत असल्याचे राजन सरमळकर सांगतात. याच विचारातून गावातील कुटुंबांना घरांसाठी जमीन उपलब्ध करून देणे, रस्त्यासाठी जागा देणे आणि धार्मिक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामस्थांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. जनहिताच्या कामांमध्ये आमदार निलेश राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्य मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. धार्मिक परंपरेचे जतन, सामाजिक सलोखा, महिलांचा सन्मान आणि ग्रामस्थांच्या मूलभूत गरजांसाठी योगदान अशा विविध माध्यमांतून राजन सरमळकर यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.
▪️अमित खोत | मालवण

उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
