कुडाळमध्ये भगवे वादळ…!!!!
महाविकास आघाडीच्या जाहीर सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद
रणरणत्या उन्हात देखील सभेला नागरिकांची गर्दी
निलेश जोशी | कुडाळ : 50-50 खोक्यांसाठी व मंत्री पदांसाठी काही लोक कसे धावत गेले ते सर्वांना ज्ञात आहे. माझी ही चौथी निवडणुक आहे. एकच नेता एकच पक्ष’ माझा आहे. मला अनेक ऑफर आल्यात, माझ्यावर अडिच वर्ष चौकशी सुध्दा सुरू आहे. तरी सुध्दा एकही रूपयाचा भ्रष्ट्राचार माझा मिळालेला नाही. मी आजही सांगतो, माझा एक रूपयाचा भ्रष्ट्राचार असेल त्यावेळी मला फासावर लटकवा. कारण मी सर्व सामान्य लोकांचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. अशी भावनिक साद घालत आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित कार्यकर्त्याना येत्या विधानसभा निवडणुकीत पाठीशी राहण्याचे आवाहन केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कुडाळ शहरातील अनंत मुक्ताई हॉल समोरील पटांगणार झालेल्या आमदार वैभव नाईक यांची ही सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. रखरखत्या उन्हात घामाच्या धारा वाहत असताना देखील कुडाळ मालवणचे नागरिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांची भाषणे ऐकत होती.
. आमदार वैभव नाईक यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पण त्यापूर्वी भर उन्हात अनंत मुक्ताई समोरच्या पटांगणात महाविकास आघाडीची सभा झाली. या सभेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. हातात मशाल, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, वैभव नाईक यांचे कटआउट्स घेतलेले कार्यकर्ते आणि सभा स्थानी लावलेले भगवे, सर्वानी परिधान केलेल्या भगव्या टोप्या यामुळे वातावरण शिवसेनामय झाले होते. भाई गोवेकर आणि परशुराम उपरकर यांच्या हस्ते शिवछत्रपती आणि बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पर अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी महायुतीवर आणि विशेषतः राणे परिवारावर जोरदार टीका केली.
यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले, मी मनापासून आपल्या सर्वांना धन्यवाद देतो की, तुम्ही मला गेली दहा वर्ष कुडाळ मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. गेल्या दहा वर्षातील प्रत्येक दिवस मी मतदार संघातील विकासासाठी आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्यासाठी खर्च घालवला आहे, म्हणुनच आपण या तळपत्या उन्हात माझ्यासाठी उपस्थित राहिला आहात. तुमचे हे ॠण मी कधीच विसरू शकत नाही. संघर्ष केलेल्या एका कुटूंबातला मी मुलगा आहे. मी राजकीय संघर्ष सुरू ठेवला आहे. दहा वर्षापूर्वी तुम्ही मला आमदार केलं तेव्हा माझ्या वडिलांना खुप आनंद झाला होता. खरं तर आज हे सर्व पाहण्यासाठी ते राहिले पाहिजे होते, पण ते आपल्यात नाहीत. माझा भाऊ राजकारणात नाही. सुशांत नाईक राजकारणात आहे.ते सगळं करताना तुमच्या सारखेच कार्यकर्ते, वडिल, भाऊ म्हणुन मला सहकार्य करतील, आशिर्वाद देतील याची मला खात्री आहे. असा विश्वास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव विजय नाईक यांनी व्यक्त केला.
आमदार वैभव नाईक पुढे म्हणाले, आपल्या मतदारांचा कुठेही अपमान न होण्याचा, तुमची मान माझ्यामुळे खाली न जाण्याचा एकही प्रसंग मी होवू दिला नाही. 50-50 खोक्यांसाठी व मंत्री पदांसाठी काही लोक कसे धावत गेले ते सर्वांना ज्ञात आहे. माझी ही चौथी निवडणुक आहे. ‘एकच नेता एकच पक्ष’ माझा आहे. मला अनेक ऑफर आल्यात, माझ्यावर अडिच वर्ष चौकशी सुध्दा सुरू आहे. तरी सुध्दा एकही रूपयाचा भ्रष्ट्राचार माझा मिळालेला नाही. मी आजही सांगतो, माझा एक रूपयाचा भ्रष्ट्राचार असेल त्यावेळी मला फासावर लटकवा. कारण मी सर्व सामान्य लोकांचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. जनतेच्या ताकदीवर अनेक प्रसंगांना तोंड दिलेलं आहे. भ्रष्ट्राचाराची अनेक प्रकरणे गेल्या अडिच वर्षात सरकारच्या माध्यमातून झाली आहेत ती बाहेर काढण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करत आहोत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा भ्रष्ट्राचार बाहेर काढला म्हणुन विरोधक आमच्यावर आरोप करत आहेत. यामध्ये वैभव नाईक असतील म्हणून त्यांना पाकिस्तानला पाठवा. असे विरोधक खरंतर दुश्मनांना सुध्दा मिळू नयेत, अशा या विरोधकांना आपण धुळ चारली पाहिजे. काल कणकवलीचे आमदार नितेश राणे सांगत होते की, वैभव नाईक यांनी विकास केलेला नाही. मी ताकदीने सांगतोय या दोन्ही मतदार संघामध्ये तुलना करा माझ्या कुडाळ मतदार संघात प्रामाणिक भ्रष्ट्राचार मुक्त विकास झाला आहे. कणकवलीच्या आमदारांच्या मतदार संघामध्ये कोल्हापुरला जाणारा रस्ता गेली दोन वर्ष बंद आहे. भ्रष्ट्राचार करून रस्त्याची 100 कोटी रूपयाची कामे रखडून ठेवायची हे त्यांचे उद्योग आहेत.
सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर दरवर्षी सांगत आहेत आपण मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल काढत आहोत पण आमच्या मतदार संघात महिला रूग्णालय उभ राहिलं, शासकीय मेडिकल कॉलेज सुध्दा उभ राहिलयं आणि विरोधी मंडळी केवळ आश्वासन देत आहेत. माझ्या मतदार संघामध्ये अनेक पाण्याच्या योजना सुरू झाल्या आहेत. मालवण शहरामध्ये सुध्दा पाण्याच्या योजनेची वर्क ऑर्डर झाली असुन ते काम सुध्दा लवकरच सुरू होईल. नाही तर मंत्री दिपक केसरकर रेडीवरून, तिलारीवरून पाणी आणलं जाईल असे सांगत फिरत आहेत पण प्रत्यक्षात काय ते सर्वांना माहिती आहे. आंबा, काजु फळपिक विमा योजना उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंजुर करून घेतली आणि शेतकर्यांना त्याचा फायदा करून दिला पण आज सरकारचे प्रतिनिधी शेतकर्यांना फसवत आहेत. भात खरेदीची 78 केंद्रे सुध्दा या जिल्ह्यात आम्ही वेळेत सुरू केली. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी एकमेव आमदार असेन की ज्याने एलईडी मासेमारीच्या विषयात सातत्याने आवाज उठविला आहे. एलईडीने मासेमारी करणारे सदस्य कुणाचे आहेत? कुठल्या ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत? कुणाचे नगरसेवक आहेत? माजी पालकमंत्र्याचे एलईडी कीती होते? याचा सर्वांनी विचार केला पाहिजे. ज्या- ज्या ठिकाणी भ्रष्ट्राचार होईल त्या- त्या ठिकाणी आम्ही हा भ्रष्ट्राचार बाहेर काढू.
नारायण राणे म्हणतात की मी गेल्या दहा वर्षात वैभव नाईक ने काय केल? मी आज आमदार म्हणुन तुमच्या समोर आहे. राणेंच्या दोन्ही मुलांना आमदारकी कशासाठी पाहिजे? कणकवली मध्ये त्यांचा एक बंगला आहे. मालवण मध्ये एक बंगला आहे. राणेंची ही सरमज्यामशाही चालु द्यायची नाही. लोकशाही मध्ये सामान्य कार्यकर्त्यांनी लोकासमोर आलं पाहिजे. मी गेली दहा वर्ष तुमच्या समोर आहे माझं काम तुमच्या समोर आहे. सर्वांच्या सुखदुःखात मी सहभागी झालेलो आहे. कोरोणा काळात सुध्दा हा वैभव नाईक कुटूंबाची पर्वा न करता रस्त्यावर फिरत होता. आम्ही सामान्य कार्यकर्त्यांचे प्रतिनिधी आहोत. तोक्ते वादळात आठ दिवस घरी गेलो नाही. लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांनी वाटलेले पैसे भ्रष्ट्राचाराचे होते. छत्रपतींचा पुतळा, सिंधुदुर्ग किल्ला,रस्ते या सर्व भ्रष्ट्राचारातील कामांचे पैसे त्या निवडणुकीत वाटले गेले. जिल्हापरिषद मध्ये पहिल्यांदाच बाऊंन्सर आणले गेले. अवघ्या तीन- चार महिन्याच्या खासदारकीत विरोधक ठोकशाही सुरू करत आहेत. बाऊन्सर सारखी प्रकरण होवू द्यायची नाही तर वेळीच सावध राहा. नारायण राणे केंद्रिय मंत्री असताना त्यांनी काय केले असा सवालही यावेळी वैभव नाईक यांनी उपस्थित करत राणेंवर टीकास्त्र सोडले.
राणेंसह त्यांच्या मुलांच्या कुंडल्या माझ्याकडे - उपरकर
कालची महाविकास आघाडीची सभा छपराखाली होती, शिवसेना तापली पाहिजे. नारायण राणेंना पण त्या छपराखाली दोनवेळा सांगावं लागलं थांबा म्हणुन. कुडाळ एमआयडीसी बंद पडली असं त्यांचा मुलगा सांगतो पण तुझा बाबाचं होता ना उद्योगमंत्री? त्यांनी काय केले?. सतिश सावंत, संजय पडते, राजन तेली असे सर्वजण राणेंना सोडून का गेले? याचा विचार त्यांनी करावा. या निवडणूकीत आ. वैभव नाईक यांना निवडून देवून आपल्याला सिंधुदुर्गचे पालकमंत्री करायचे आहे. नारायण राणे आपण सर्वांना रोजगार दिला असे म्हणत आहेत. पण ते आपल्या कामगारांचे पगार देवू शकत नाहीत हे वास्तव आहे. त्यामुळे आता तुम्ही सर्वांनी धीर धरा, थोडा वेळ थांबा. येत्या 23 तारीखला तुम्हा सर्वांना एसीत बसायचं आहे. घराणे शाहीच्या बुडाला मशालीने आग लावायची आहे. आता राणेंची ही घराणेशाही गाडायची आहे. लोकांच्या घराघरात जावून धगधगती मशाल पोचवा आणि वैभव नाईक यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन श्री. उपरकर यांनी करून राणे व त्यांच्या मुलांच्या कुंडल्या कुणाकडे नसतील एवढ्या माझ्याकडे आहेत त्या उघड करायला लावू नका असा इशाराही त्यांनी दिला.
गद्दारांचा बदल घेण्याची हीच खरी वेळ - अमित सामंत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत राहून चाळीस आमदार फोडले. यांच्याबरोबर भाजपची लोक होती. त्याचा बदला घेण्याची वेळ आता आलेली आहे. लोकसभेत मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झाला. महाराष्ट्राच्या हृदयावर गद्दारीचा आघात झाला हे लोक विसरले नाहीत. कुडाळ मालवणची जनता सुद्धा परत एकदा आपल्या मतदानातून या मोदी आणि सर्व गटाला, गद्दारांना आमदार वैभव नाईक यांना बहुमताने विजय करून उत्तर देतील असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सांगितले.
सुखदुःखात मदत करणाऱ्या आमदारांना निवडून द्या - जान्हवी सावंत
महाराष्ट्राला संपवण्याचा काम हा मोदी करीत आहेत. शिवसेनेत उभी फूट पडली. त्यावेळी आमदार वैभव नाईक सुद्धा 50 कोटी घेऊ शकले असते. पण त्यांनी या कुडाळच्या लोकांनी मला निवडून दिले त्यांच्याशी मी गद्दारी करणार नाही. म्हणून ते आपल्या मताशी ठाम राहिले. आपल्याकडे येणारा सर्वसामान्यांच्या सुखदुःखात मदत करणारा माणूस निवडून देणार की ज्यांनी सत्तेसाठी अनेक पक्ष बदलले अशा माणसाला तुम्ही निवडून देणार? जे कोणाचे होऊ शकले नाहीत ते तुमचे तरी कसे होतील ? असा सवाल उपनेत्या जान्हवी सावंत यांनी उपस्थित करून आमदार वैभव नाईक यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
काँग्रेसवर टीका करणाऱ्यांना राणेंची घराणेशाही चालते का - इर्शाद शेख
गुरुपुष्यामृत योगावर वैभव नाईक यांचा अर्ज दाखल होत आहे. त्यामुळे वैभव नाईक यांचा विजय निश्चित आहे. सगळ्यांच्या सुखदुःखात मिसळणारा आमदार असे वैभव नाईक यांचे वर्णन केले जाते असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी सांगितले. भाजपवाले आणि मिंधे काँग्रेसवर घराणेशाही म्हणून टीका करतात. पण आज भाजपच्या घराणेशाहीवर हे बोलणार आहेत का ? राणेंच्या घराणेशाहीवर हे बोलणार का ? ही घराणेशाही चालते का ? लाडक्या बहिणीला आमिष दाखवून दिलेले हे पंधराशे रुपये आहेत. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर दीड हजार नाही तर 2000 दिले जातील असे इर्शाद शेख यांनी सांगितले.
वैभव नाईक नक्की हॅट्रिक करतील - संजय पडते
सर्वसामान्यांचा आमदार अशी वैभव नाईक यांची ओळख आहे. वैभव नाईक यावेळी निश्चित हॅट्रिक करतील. हक्काचा आमदार या जिल्ह्याचा पालकमंत्री झाले तर महाविकास आघाडीच्या सरकारात येथील प्रत्येकाला न्याय मिळेल. असे संजय पडते यांनी सांगितले. मशाल निशाणी घराघरात पोहोचवायचे आहे पण काहीजण दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यापासून सावध राहा असं आवाहन संजय पडते यांनी यावेळी केले.
शिवधनुष्य हाती घेणे कोणाचेही काम नाही - हरी खोबरेकर
शिवधनुष्य हाती घेणे हे ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही.राक्षसी प्रवृत्तीच्या हातात शिवधनुष्य शोभत नाही, अशी टीका हरी खोबरेकर यांनी निलेश राणे यांच्यावर केली. . मच्छीमारांसाठी तुम्ही जर काही काम केले असाल तर त्याचा एक तरी व्हिडिओ आमच्या मच्छीमरणाचा दाखवा तेव्हाच आहे तुमचं स्वागत करू. मच्छीमारांसाठी सिंधू रत्नाच्या माध्यमातून मोठा निधी आमदार वैभव नाईक यांनी आणला असल्याचे खोबरेकर म्हणाले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, माजी मंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, व्हिक्टर डांटस, प्रसाद रेघे, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी स्नेहा नाईक, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख उपनेत्या जान्हवी सावंत, जिल्हाप्रमुख नीलम पालव, श्रेया परब,हरी खोबरेकर, राजन नाईक, बबन बोभाटे,मंदार केणी, यतीन खोत, अभय शिरसाट, सुशांत नाईक, कन्हैया पारकर, अतुल बंगे, सचिन कदम, बाळा कोरगावकर, अनुप नाईक,किरण शिंदे, संतोष शिरसाट, गणेश कुडाळकर तपस्वी मयेकर, संमेश परब, शिल्पा खोत, उदय मांजरेकर, योगेश धुरी, मंदार ओरसकर, पूनम चव्हाण, दीपा शिंदे, स्नेहा दळवी, मथुरा राऊळ,सुशील चिंदरकर, नितीन वाळके,श्रेया गवंडे आदींसह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते कुडाळ मालवणची जनता हजारोंच्या संख्येने उपस्थित होती. कुडाळ शहरातील अनंत मुक्ताई हॉल समोरील पटांगणार आमदार वैभव नाईक यांची ही सभा पार पडली.रखरखत्या उन्हात घामाच्या धारा वाहत असताना देखील कुडाळ मालवणचे नागरिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांची भाषणे ऐकत होती. हेच या सभेच वैशिष्ट्य म्हणावं लागेल.

