कणकवली : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारीची तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी तालुका स्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिन राबविण्यात यावा, अशा सूचना शासनाने यापूर्वीच जारी केल्या आहेत. त्याअनुषंगाने कणकवली तहसीलदार कार्यालय येथे सोमवारी, २१ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता लोकशाही दिन साजरा करण्यात येणार आहे.
लोकशाही दिनात ग्रामविकास, गृह विभाग, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, वनीकरण, परिवहन, बीएसएनएल, वीज वितरणसह सर्वच विभागामधील तालुका अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तक्रार अर्ज सादर करायचा असल्यास 'नमुना प्रपत्र १ अ' सोबत विहित नमुन्यातील अर्ज तहसीलदारांना उद्देशून २ प्रतीत पाठवायचा आहे.
लोकशाही दिनात न्यायप्रविष्ट प्रकरणे, अपिल्स, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे, देण्यात येणार आहे, अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज, तसेच तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल तर सदर अर्ज स्वीकृत करता येणार नाहीत.
लोकशाही दिनात अर्ज स्वीकृत केल्यानंतर ज्या विभागाशी संबंधित तक्रार आहे, त्या विभागाच्या विभागप्रमुखांकडे संबंधित अर्ज पाठवून कार्यवाहीचा अहवाल, अर्जदाराची विनंती, त्याबद्दलचे नियम, शासनाची भूमिका, तरतुदी या बाबींचा विचार करून लोकशाही दिन प्रमुख योग्य निर्णय देतील. तसेच, जे अर्ज लोकशाही दिनाकरिता स्वीकृत करता येऊ शकणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी ८ दिवसात पाठवून त्याची प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल. अर्जदाराला अंतिम उत्तर लोकशाही दिनी वा त्यानंतर शक्य तितक्या लवकर महिन्याच्या आत देण्यात येईल. लोकशाही दिनाकरिता अर्जदाराने मूळ अर्जासोबत सादर करायचे 'नमुना प्रपत्र १ अ' हे तहसील कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहे.
दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सार्वजनिक सुटी असेल, तर त्यानंतर येणारा कामकाजाचा दिवस लोकशाही दिन म्हणून पाळण्यात येईल.

