रविवारी निवती पोलिसांनी केली होती अटक
निलेश जोशी | कुडाळ : तालुक्यातील कवठी अन्नशांतवाडीत येथील संदीप उर्फ बाळा दामोदर करलकर (५२) खून प्रकरणातील रामचंद्र उर्फ दादा दत्ताराम करलकर (४०) व शैलेश दत्ताराम करलकर (४३) या दोन सख्या भावांना संशयित आरोपी म्हणून निवती पोलिसांनी रविवारी अटक केली. या दोन्ही संशयितांना सोमवारी कुडाळ येथील न्यायालयात हजर केले असता सहदिवाणी न्यायाधीश पी.आर.ढोरे यांनी गुरुवार दि. ६ मार्च पर्यंत म्हणजेच चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
कवठी येथील श्री.करलकर यांच्या काजूच्या बागेत जाऊन संदिप करलकर याने काजू चोरले व वडिलांना व कामगाराला धमकावले,यांचा राग मनात ठेवून करलकर बंधूंनी आपल्या कामगाराला सोबत घेत संदिप करलकर याला घरी जाऊन जाब विचारला. यावेळी झालेल्या झटापटीत संदीप करलकर याला जबर मारहाण झाली होती. त्यानंतर संदीप करलकर त्याच्या घरात मृतावस्थेत आढळला होता. याबाबतची फिर्याद संदीप करलकर याचा मुंबईस्थित भाऊ संतोष करलकर याने निवती पोलिस स्थानकात दिली होती. त्यानुसार निवती पोलिसांनी अज्ञाता विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून आपली यंत्रणा चौकशीसाठी कामाला लावली होती.
पहिल्या टप्प्यात करलकर बंधू यांचा कामगार श्यामसुंदर वाडयेकर याला निवती पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली होती, त्याला न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून सध्या तो कोठडीत आहे. त्यानंतर रविवारी सायंकाळी उशिरा निवती पोलीस ठाण्याचे अधिकारी भीमसेन गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रामचंद्र करलकर व शैलेश करलकर या दोन संशयित बंधूना ताब्यात घेत अटक केली व सोमवारी कुडाळ न्यायालयात हजर केले.
यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने ऍड. मनिषा परब यांनी बाजू मांडली. खुनाच्या घटनेनंतर संशयित आरोपी दोन व तीन (दादा करलकर व शैलेश करलकर) हे फरार होते. रविवारी त्यांना अटक केली. त्याच्याकडुन अधिक माहिती घेणे आवश्यक आहे. या प्रकरणात त्याच्या सोबत कोण-कोण होते? घटनेदरम्यान त्यांनी कोणते कपडे परिधान केले होते? तसेच आतापर्यंत त्यांनी पोलिसांना कोणतेही सहकार्य केले नाही. त्यामुळे या दोन्ही संशयित आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळावी अशी पोलिसांची मागणी आहे. गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन आपण त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी ऍड परब यांनी न्यायाधीशाकडे विनंती केली.
संशयित आरोपींच्या वतीने ऍड. .गौरी देसाई यांनी बाजू मांडली. त्या म्हणाल्या की ,या गुन्हातील आरोपी अटक आहेत. या घटनेत मृत झालेल्या व्यक्तीची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. अनेक केसेस त्यांच्यावर दाखल आहेत. फिर्यादीची एआयआर बघितली तर तसंच दिसून येत आहे. याउलट संशयित आरोपी रामचंद्र करलकर व शैलेश करलकर यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची नाही. यातील एका आरोपींची पत्नी तर सरपंच आहे असे ऍड.देसाई यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले व दोन्ही आरोपींना पोलिस कोठडीची आवश्यकता नाही असे कोर्टासमोर बाजू मांडली. दोन्ही बाजू ऐकून घेत सहदिवाणी न्यायाधीश पी.आर.ढोरे यांनी दोन्ही करलकर बंधूना चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
यावेळी निवती पोलीस स्थानकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी सुद्धा कोर्टासमोर आपली बाजू भक्कम पणे मांडली.यावेळी पोलिस उपनिरीक्षक नितीन पाटील,पोलिस हवालदार आशिष केळकर,सचिन सोनसुरकर, पोलीस अंमलदार नितीन शेडगे उपस्थित होते.
VIDEO NEWS | राजकोट | छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणीला सुरवात

