सावंतवाडी : सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आयोजित मॅरेथॉन स्पर्धा सावंतवाडीत १९ जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता सुरू होणार आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन संस्थाध्यक्ष सुनील राऊळ यांनी केले आहे. सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स सर्व्हिसमेन असोसिएशन संचलित सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, आंबोली आणि सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, आंबोली या सैनिकी शाळेच्या स्थापनेस २१ वर्षे पूर्ण झाल्याने २१ व्या वर्धापन दिनानिमित्त ही मॅरेथॉन स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हयातील धावपटूंसाठी आयोजित करण्यात आली आहे. १९ जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता सावंतवाडी येथील जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान येथून या मॅरेथॉन स्पर्धेस प्रारंभ होईल. ही स्पर्धा खुला गट (पुरुष / महिला), दहा वर्षांखालील (मुले / मुली), १४ वर्षांखालील (मुले / मुली), १७ वर्षांखालील (मुले / मुली) अशा गटात होणार आहे. या सर्व गटांतील विजेत्या धावपटूंना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. इच्छुक स्पर्धकांनी नाव नोंदणीसाठी ९४२०१९५५१८ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच स्पर्धेसाठी येताना आपले आधारकार्ड घेऊन येणे अनिवार्य आहे. जास्तीत जास्त धावपटूंनी मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष सुनील राऊळ यांनी केले आहे.

