रसिकांना गीत-नृत्याची मेजवानी
हजारो रसिकांची उपस्थिती
निलेश जोशी | कुडाळ : लायन्स क्लब ऑफ कुडाळ आयोजित फूड फेस्टिवल मध्ये नवीन वर्ष २०२५ चे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप या पार्श्वभूमीवर जल्लोषी वातावरणात हजारो रसिकांच्या उपस्थितीत हा नेत्रदीपक सोहळा दिमाखदार साजरा करण्यात आला. सिनेसृष्टीतील नामांकित कलावंतानी चौथ्या दिवसाच्या फूड फेस्टिवलची अनोखी रात्र आपल्या सुरेल गायनाने व नृत्याविष्काराने डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरविली.
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागत पार्श्वभूमीवर लायन्स क्लब ऑफ कुडाळ, सिंधुदुर्ग या सेवाभावी संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या 23 व्या लायन्स फूड फेस्टिवलला कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर चौथ्या दिवशी हजारोंची उपस्थितीत शानदार सांगता झाली. ३१ रोजी सई एंटरटेनमेंट प्रस्तुत Countdown Begins 2025" डान्स अँड म्युझिकल लाईव्ह कंसर्ट आयोजित या कार्यक्रमात एकत्रितपणे विविध वाद्यकार, गायक आणि नर्तक यांनी आपली कला सादर केली. सुप्रसिद्ध गायकांच्या यादीत अनुष्का शिकतोडे (सूर नवा ध्यास नवा फेम), धनश्री कोरगावकर (महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम), गणेश मेस्त्री (इंडियन आयडॉल फेम) आणि हर्षद मेस्त्री (स्वरकोकण रत्न) यांसारख्या प्रतिभावन प्रसिद्ध कलाकारानी आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलें. याशिवाय, उत्कृष्ट अभिनेत्री, मॉडेल, नृत्यांगना आणि कोरियोग्राफर मिनाक्षी पोशे यांचे नृत्य लक्षवेधी ठरले.
चौथ्या दिवसाच्या संगीत रजनीची सुरुवात गणेश मेस्त्री व हर्षद मेस्त्री या बंधूनी देवा श्री गणेशा, देवा तुझ्या दारी आलो या भक्तिमय गणेश गीताने करून हजारो रसिकांच्या उपस्थितीत वातावरण भक्तिमय केले. त्यानंतर आपल्या सुरेल आवाजाने अनुष्काने तेरी दिवानी या गीतावर रसिकांना ठेका धरायला लावला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, आज कोकणात मी पहिलीच कुडाळमध्ये आलेली आहे आणि तुमच्या हजारोंच्या उपस्थितीत मी 31 डिसेंबर साजरी करताना मला खूप आनंद होत आहे. आज या सोहळ्यात मी भारावून गेले असल्याचे सांगितले. त्यांनी यावेळी अनेक उडत्या चालीची गीते सादर करत रसिकांना आपल्या सुरेल आवाजाची पर्वणी दिली. मेस्त्री बंधूनी विविध गीते सादर करतानाच रसिकांच्या फर्माईश गीते सादर केली. धनश्री कोरगावकर यांनी लावणी गीते सादर केली. त्याचबरोबर नृत्यांगना मीनाक्षी पोशे यांनी उडत्या चालीच्या गाण्यावर नृत्य करत रसिकांना या नृत्यावर ठेका धरायला लावला.

संपूर्ण रजनी कार्यक्रमात खामोशिया तेरी मेरी…. दम दमा दम मस्त कलंदर …, आयुष्य हे चुलीवरच्या कढईतले कांदेपोहे…, चमचम करता है नशीला बदन…, गुलाबी साडी …., कोंबडी पळाली अशा जुनी नवीन गीते सादर करत या लायन्स फेस्टिवलच्या सोहळ्यात त्यांनी चार चांद लावले. पोरी जरा जपून …ये ग ये मैना… विंचू चावला.. अशी एकाहून एक गीते सादर करत उत्तरोत्तर हा सोहळा अधिकच रंगतदार ठरला. कार्यक्रमाची सांगता जय श्रीराम भक्ती गीताने करत नवीन वर्षाचे जल्लोषी स्वागत होतानाच हा परिसर भक्ती रसात न्हाऊन निघाला.

या संगीत रजनी कार्यक्रमात वाद्यवृंद हा सुद्धा महत्त्वाचा घटक होता. विशेष म्हणजे संगीताच्या ठेक्यावर हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतदार ठरला वादकांमध्ये गिटार - प्रवीण जाधव, सांगली, हँडसोनीक, ढोलक, डोलकी- शेखर सर्पे, कणकवली, ऑक्टोपॅड हर्षद खराडे, मालवण, सिंथेसाईजर दिनेश वालावलकर, वालावल, तबला, डफ, तुंबा, ऑक्टोपॅड - सचिन कुडतडकर परकर्षण - युवराज कुर्ले गौरव पिंगुळकर - ढोलक, ढोलकी, संबळ साथ गंधार कदम यांनी दिली.

