मिली मिश्रा | कसाल : कसाल येथील उद्योजक संतोष कदम आणि डॉ. श्रेया कदम यांची कन्या तन्वी हिने चार्टर्ड अकाऊंटंट या परीक्षेत यश मिळविले. अतिशय कमी टक्केवारीत या परीक्षेचा निकाल लागतो. हा निकाल देशपातळीवर असतो. ती एकाच वेळी दोन ग्रुप घेवून या परीक्षेस बसली होती आणि पहिल्याच प्रयत्नात ती चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाली. ती डॉन बॉस्को हायस्कूल ओरोसची विद्यार्थिनी होती.दहावीच्या परीक्षेत तीने १००% गुण मिळविले होते. तसेच मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स येथे बारावीच्या परीक्षेत ती ९२% मिळवून उत्तीर्ण झाली होती तसेच बी.कॉम. परीक्षेतही टॉपर होती.
सातत्याने शैक्षणिक वाटचालीत तिने यापूर्वी खेळ, सांस्कृतिक विभाग आणि अभ्यास या क्षेत्रात यश मिळविले होते.
आपल्या यशाबद्दल बोलताना ती म्हणाली क्षेत्र कोणतेही असो, जिद्द, चिकाटी, मेहनत, सत्य आणि एकाग्रता यावर ते अधोरेखित करता येते. हा आई-वडिलांनी दिलेला आत्मविश्वास व गुरुवर्यांचे मार्गदर्शन यामुळेच मला यश मिळू शकले. या अभ्यासक्रमातील आर्टिकलशिप तिने मुंबई येथील सीए यांच्याकडे केली होती. अभ्यासातील सातत्य ठेवल्यास अशा अवघड परीक्षा आपण सहज उत्तीर्ण होऊ शकतो असा संदेश तिने या निमित्ताने सीए परीक्षेसाठी प्रविष्ट असलेल्या विद्यार्थी वर्गाला दिला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आई-वडिलांनी केलेला त्यांचा जीवन प्रवास आणि माझ्याकडून त्यांच्या अपेक्षा याची छोटीशी भेट मी त्यांना दिली आहे असेही ती म्हणाली.
देशपातळीवर घेतलेल्या चार्टर्ड अकाउंटंट या परीक्षेचा निकाल १३ टक्के लागला असून त्यात तनवी हीचे मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. तिच्या या यशाबद्दल समाजातील सर्व स्तरातून आणि कदम परिवार यांच्या मित्र परिवाराकडून तिचे अभिनंदन केले जात आहे. खासदार नारायण राणे व नीलम राणे यांनी फोन करून अभिनंदन केल्याची माहिती संतोष कदम यांनी दिली आहे.

कसालच्या तन्वी कदमचे चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत यश.
