विकासनिधी आणण्याची जबाबदारी माझी : प्रत्येक अधिकाऱ्यांकडून जबाबदारीपूर्वक काम अपॆक्षित
शहरवासियांना, पर्यटकांना दर्जेदार सेवा सुविधा मिळाल्याच पाहिजेत
आमदार निलेश राणे यांनी नगरपरिषद येथे सर्व विभागांचा घेतला आढावा
मालवण | प्रतिनिधी : 21 व्या शतकातील विकसित व स्वच्छ, सुंदर मालवण शहर बनवण्यासाठी आमदार म्हणून मी प्रयत्नाशील आहे. अधिकाऱ्यांनी गांभीर्यपूर्वक पदाला साजेसे योगदान द्यावे. मागच्या दहा वर्षात काहीच झाले नाही मात्र आता कारणे नको गती पकडा. जिद्दीने कामाला लागा. विकासनिधीचे प्रस्ताव तयार करा. शासनस्तरावरून अधिकाधिक विकासनिधी आणण्यासाठी मी सतत प्रयत्नाशील राहणारच आहे. असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी मालवण नगरपरिषद येथे बोलताना केले..
आमदार नीलेश राणे यांनी मालवण शहरातील विकासकामांसदर्भात शुक्रवारी सकाळी नगरपालिका सभागृहात प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून आढावा घेतला. यावेळी त्यांनी शहरातील विविध विभागांच्या कामकाजाची माहिती घेताना रखडलेले विकासप्रकल्प, प्रस्तावित विकास प्रकल्प, नादुरुस्त प्रकल्प यांची माहिती घेतली. तसेच शहर स्वच्छता, भटके कुत्रे, नळपाणी योजना, स्ट्रीटलाईट, कर आकारणी, सीआरझेड, शहर विकास आराखडा, बचतगट, आदी सर्वच विषयांवर पालिकेची स्थिती आणि शासनाकडून आवश्यक असणारे पाठबळ यावर सविस्तरपणे चर्चा केली. मालवणवासियांना स्वच्छ व सुंदर शहराचे अभिवचन देण्यात आलेले असून यापुढे ज्या अधिकाऱ्यांवर जी जबाबदारी आहे, त्यांनी ती प्रामाणिकपणे पार पाडणे आवश्यक आहे. पुढील पाच वर्षात शहरवासियांना, पर्यटकांना आपण काय सेवा सुविधा देणार, देत असलेल्या सेवा सुविधा योग्य प्रकारे आहेत कां? यावर चर्चा करण्यासाठी आलो आहे. अधिकारी वर्गाने आपल्या जबाबदारीकडे अधिक लक्ष द्यावे. कामात हयगय आणि कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही. नव्याने अनेक सुविधा, निधी तरतूदि लवकरात लवकर केल्या जातील. सध्य स्थितीत उपलब्ध असलेल्या व्यवस्थेमध्ये चांगल्यात चांगले काम करण्याची मानसीकता सर्वांनी बनवावी, असेही आमदार निलेश राणे यांनी अधिकारी वर्गांना सांगितले.

आमदार निलेश राणे यांनी शुक्रवारी मालवण नगरपरिषद येथे भेट दिली. सभागृहात बैठक घेत अधिकाऱ्यांकडून सर्व विभागांचा आढावा घेतला.
यावेळी मालवण नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, भाजपा शहरअध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, पंकज सादये, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गांवकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, शर्वरी पाटकर, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, संतोष साटविलकर, युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष राकेश सावंत, शहरप्रमुख ललित चव्हाण, निषय पालेकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, विक्रांत नाईक, नारायण लुडबे, किशोर खनोलकर, राजु बिडये, मंदार लुडबे, संदीप मालंडकर यांसह अन्य पदाधिकारी व प्रशासन अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी शहरातील विकासकामे व इतर कामकाजाची माहिती दिली.
माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर म्हणाले खासदार राणे साहेबांच्या माध्यमातून रॉक गार्डन, मामा वरेरकर, चिवला बीच बंधारा हे मोठे प्रकल्प झाले. मात्र त्या नंतर मागील दहा वर्षात काहीच झाले नाही. मात्र आता आपल्याला हक्काचे आमदार लाभले आहेत. प्रशासनाने जास्तीत जास्त प्रस्ताव सादर करावेत. शासनाकडून निधी उपलब्ध होण्यासाठी आमदार निलेश राणे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपा शहर अध्यक्ष बाबा मोंडकर म्हणाले, आमदार निलेश राणे यांनी शहर विकासाचे व्हिजन स्पष्ट केले. सोबतच बचतगटांसाठी मार्केट उभे करण्यासाठी नगरपालिकेने पुढाकार घ्यावा, नगरपालिकेने ब्रँड निर्माण करावा. बचत गटांना बळ द्यावे. हे निलेश राणे यांचे सर्वसामान्य प्रति असलेले आपुलकीचे नाते स्पष्ट करणारे आहे. विकासा सोबत जनतेची काळजी घेणारे आमदार आपल्याला लाभले असे मोंडकर म्हणाले.
मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी प्रशासनाच्या कारभरावर टीकास्त्र सोडले. नियोजनाचा अभाव असल्याने शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या. कमी मनुष्यबळ व अन्य कारणे सांगण्याचे काम झाले. शहर सेवा सुविधा यावर कोणतेही लक्ष देण्यात आले नाही. पिंपळ पार येथील फाउंटन दीड वर्षे बंद आहे. रॉक गार्डन येथील डेकोरेटिव्ह लाईट बंद आहेत. कचरा उचल गाड्या कचरा सोडून भंगार व अन्य ठिकाणी साहित्य गोळा करतात. योग्य प्रकारे कचरा उचल होत नाही. अनेक ठिकाणी समस्या आहेत. सांगूनही त्यावर उपाययोजना होत नाहीत. असे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी सांगितले. यावर आमदार निलेश राणे यांनी प्रशासनास यावर लक्ष केंद्रित करायला सांगत आहे त्या मनुष्यबळ व सुविधा यात अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करा. तक्रारी येता नये असे स्पष्ट शब्दात सांगितले.

एक चांगलं सुंदर शहर, २१ व्या शतकातील शहर दिसण्यासाठी ज्या काही गोष्टी करणे गरजेचे आहे ते सगळे सहकार्य मदत असेल. एक आमदार या नात्याने प्रत्येक डिपार्टमेंटला आवश्यक मदत देण्याची ग्वाही मी देतो. माझे सर्व सहकार्य लाभेल मी कुठे कमी पडत आहे. असे वाटल्यास नक्की सांगा. मात्र मालवण शहर विकास हेच आपले लक्ष असले पाहिजे. आता इथे आमदार बदललेले आहेत, खासदार बदललेले आहेत आता तसा कामचुकारपणा चालणार नाही. प्रत्येक अधिवेशनाच्या अगोदर अशाच आढावा बैठका घेण्यात येतील, असेही श्री. राणे यांनी स्पष्ट केले.
शहरातील नवीन नळपाणी योजनेच्या कामाला ऑक्टोबरमध्ये वर्क ऑर्डर दिल्यानंतर जर काही अडचणी टेक्निकल म्हणून त्याच्यात होत्या. त्यावर आपण तात्काळ मार्ग काढा कामे लवकर झाली पाहिजेत. त्यावर मुख्याधिकारी यांनी सांगितले, आम्ही ठेकेदारांना सांगणार आहोत ते काम सुरू करा. लवकरच काम सुरू होईल. शहरवासियांसाठी शासनाने ३८ कोटींची नळ पाणी योजना मंजूर केली आहे. यामुळे हा प्रश्न निकाली निघाला आहे, काम सुरु होईल. असेही श्री. राणे म्हणाले.
सीरआरझेड एक रेषा निश्चिती बाबत काही सर्व्हे व तज्ञ टीम मार्फत होणाऱ्या कामासाठी आवश्यक असलेला निधी मी देतो मात्र कामाला उशीर नको. नागरिकांचे सीआरझेड मधील प्रस्ताव लवकरात लवकर सुलभ प्रक्रियेतुन मंजुरी होण्यासाठी आवश्यक काही गोष्टी यातून होणार असतील जे सहकार्य लागेल ते देऊ. ज्या कामासाठी पाच लाख रूपयांचा खर्च अपेक्षित होता, तोही खर्च आपण स्वतः देत असल्याचे आमदार यांनी सांगत तोही प्रश्न निकाली निघाला.
शहरात दर तीन ते चार वर्षांनी करण्यात येणारी कर वाढ बंधनकारक नाही. नियमात जो कर आहे तो घेतला जावा. मात्र कर वाढ नागरिकांच्या माथी मारू नका. शहरातील जनतेला आवश्यक सुविधा निर्माण करताना नगरपालिकेने स्वतःचा आर्थिक स्तर उंचविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. शहरातील नागरीक, पर्यटक यांना सेवा सुविधा देत असताना पालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी काही प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश राणे यांनी दिले.
बचत गट यांना सक्षम करा. त्यांचा उत्पाडीत माल विक्री झाला पाहिजे. होलसेलर मिळाले पाहिजेत. यासाठी पालिकेने प्रयत्न करावा. मीही त्यासाठी प्रयत्न करेन. बचतगट सक्षम व्हावेत यासाठी प्रयत्न करा असे आमदार निलेश राणे म्हणाले.
मालवण शहर व लगतच्या किनारपट्टी गावात वाहतुकीची होणारी कोंडी पाहता रिंग रोडचीही आवश्यकता निर्माण होत आहे. यासाठी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांशी आपली चर्चा सुरू आहे. एक परिपूर्ण आराखडा तयार झाल्यानंतर शहरातील नागरिक, तसेच देवबाग, तारकर्ली, वायरी येथील जनतेच्या फायद्याचे रस्ते रिंग रोडच्या माध्यमातून साकार करण्याचा प्रयत्न आहे. हे करत असताना कोणताही नागरिक, व्यापारी विस्थापीत होणार नाही याकडे लक्ष दिले जाईल. त्यानंतर आराखडा बनविण्यात येणार आहे. मालवण शहराला रिंग रोड आणि बाहेरून कनेक्टिव्हिटी आपल्याला गरजेची आहे. गेल्या १० वर्षात यावर काहीच काम झालेले नाही, असेही श्री. राणे म्हणाले.
मालवण शहराला नगरोत्थान योजनेतून जास्तीत जास्त निधी मिळण्यासाठी माझे प्रयत्न असतील. किमान 20, 25 कोटी रूपयांचे प्रस्ताव तुम्ही मागणी करा. कमी मागणी केली तर कमी निधी येणार. आता मागणीच जास्त असूदेत. उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. शहरातील कचरा समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प निर्माण होणे गरजेची आहे. कचरा उठविण्यासाठी कामगार, साधने वाढवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करण्याची सूचनाही त्यांनी दिली. तसेच योग्य प्रकारे कचरा उचल गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी स्पोर्ट्स कॉमलेक्स होणे गरजेचे आहे. त्याबाबतही नियोजन करा. असेही आमदार निलेश राणे यांनी सांगितले.

