राज्य, राष्ट्रीय स्तरावरील शेकडो स्पर्धक दाखल
मालवण | प्रतिनिधी : चिवला बीच येथे होणारी राज्यस्तरीय सागरी जलतरण सागरी जलतरण स्पर्धा मालवण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांनी येथे बोलताना केले.
महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या मान्यतेने आणि सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व मालवण नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने २१ व २२ डिसेंबर रोजी १४ वी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा चिवला बीच मालवण येथे होत असून या स्पर्धेचे उदघाटन शुक्रवारी सायंकाळी मालवण धुरीवाडा चिवला बीच येथील काळबादेवी एक्सओटीका रिसॉर्ट येथे करण्यात आले. यावेळी स्पर्धेच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष आनंद माने, सिंधुदुर्ग जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण परब, सचिव राजेंद्र पालकर, ज्येष्ठ जलतरणपटू पद्मश्री तपन पानिगरे, गुरुनाथ राणे, संदीप पालकर, राजू आंबेरकर आदी व इतर उपस्थित होते. यावेळी संतोष जिरगे, आनंद माने, तपन पानिगरे यांनीही विचार मांडत जलतरणपटू स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
यानंतर चिवला बीच येथे जलतरण संघटनेतर्फे आयोजित बीच कबड्डी स्पर्धेचे उदघाटन नगरपालिका मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी आनंद माने, डॉ. दीपक परब, सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष रुझारिओ पिंटो आदी व इतर मान्यवर उपस्थित होते.

