- शिक्षकी पेशासह कला व सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्ववान अष्टपैलू नेतृत्व….
💐 नवदुर्गा : पुष्प सातवे 💐
देवीचे रूप आईत आहे, देवीचे रूप बहिणीत आहे, देवीचे रूप पत्नीत आहे, देवीचे रूप मुलीत आहे, प्रत्येक स्त्री रुपात देवी आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र देवी नवदुर्गा रुपांचा उत्सव-जागर होत असताना आजच्या युगातील प्रत्येक स्त्री शक्तीलाही आदरयुक्त प्रणाम….
देवीच्या उत्सवाच्या निमित्ताने ‘स्काय न्यूज टुडे’ वेब टीमच्या माध्यमातून नवदुर्गा या सदरातून स्त्री शक्तींच्या प्रतिभासंपन्न कार्यकर्तृत्वाला प्रणाम….
नवदुर्गा : सौ. श्वेता विजय यादव

अविरत अखंड विद्यादान हे ब्रीद घेऊन शिक्षकी सेवेच्या माध्यमातून गेली 25 वर्षे कार्यरत असणारे एक आदर्श अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, जिल्हा परिषद शाळा मालवण शहर देऊळवाडा शिक्षिका सौ. श्वेता विजय या होय… एक उपक्रमशील शिक्षिका म्हणून सौ. श्वेता यादव मॅडम यांचे योगदान बहुमोल असेच आहे. सोबतच विविध कलागुणांनी संपन्न असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहे. मालवण वासीयांना अभिमान वाटावे असे हे कर्तृत्ववान नेतृत्व खऱ्या अर्थाने नवदुर्गेचे रूप आहे.

सौ. श्वेता विजय यादव उर्फ सुजाता बळीराम देऊलकर (माहेरचे नाव) या उपशिक्षिका, म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मालवण येथे कार्यरत आहेत. मॅडमचे मूळ गाव नाधवडे ता. वैभववाडी सध्या नोकरीनिमित्त मालवण येथे त्या वास्तव्यास आहेत. मॅडम यांची आणखी एक विशेष ओळख म्हणजे मालवण पोलीस स्थानक येथून मागील वर्षी सेवानिवृत्त झालेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या सौ. श्वेता या पत्नी.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक पटलावरील एक आदर्श, अष्टपैलू ‘उपक्रमशील शिक्षिका’ अशी ओळख असलेल्या सौ. श्वेता यादव मॅडम उत्कृष्ट निवेदिका, कथाकथनकार, उत्तम वक्त्या, पोवाडाकार, उत्तम् ढोलवादक, गायिका, उत्तम अभिनेत्री तसेच उत्कृष्ट कबड्डीपटू आहेत.

गुणवत्तेचा ध्यास घेवून त्यांनी आतापर्यंत अनेक विद्यार्थी घडवले. शैक्षणिक कार्याबरोबरच त्यांचे सामाजिक व राष्ट्रीय कामात महत्त्वपूर्ण योगदान आहे. शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध प्रकारची शैक्षणिक साहित्य निर्मिती, शालेय परसबाग, डिजिटल शाळा, शालेय रंगरंगोटी, शालेय प्रवेशद्वार, सुसज्ज रंगमंच, बोलक्या भिंती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, विविध सांस्कृतिक कार्यक्रमात विदयार्थ्यांचा यशस्वी सहभाग असे अनेक उपक्रम त्या सातत्याने राबवत असतात. “अविरत अखंड विद्यादान हे माझे ब्रीद… माझा विद्यार्थी माझा आत्मा”… यानुसार मॅडमची वाटचाल सुरू असते.

भारतीय जनगणना प्रगणक, गोवर रुबेला साथीच्या आजाराचे उद्बोधन, मतदान जनजागृती कार्यक्रम, स्वच्छ भारत अभियान- उपक्रम, कोरोना संसर्ग काळात RTPCR टेस्ट कार्यात सहभाग इत्यादी राष्ट्रीय कामातही त्यांचा सहभाग महत्वपूर्ण राहिला.
जिल्हा परिषद शाळा हाच शिक्षणाचा भक्कम पाया
गावागावातील जिल्हा परिषद शाळा हाच खरा शिक्षणाचा भक्कम पाया आहे. आपल्या मराठी या अभिजात भाषेतून शिक्षण दिले जाते. सर्व विषय सुलभपणे शिकवताना विध्यार्थी वर्गाच्या कलागुणांना वाव दिला जातो. मुलांची उज्वल भविष्य घडवली जातात. गोरगरीब जनतेसाठीही या शाळा हक्काच्या आहेत. या शाळा कमी होता नये. शाळातील दर्जा कायम राहावा यासाठी वरिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच आपले प्रयत्न राहिले आहेत. जिल्हा परिषद शाळा टिकाव्यात गोरगरिबांची मुले शिकावीत… यासाठी यापुढेही प्रयत्नशील असल्याचे सौ. श्वेता यादव सांगतात.
विविध पुरस्कारांनी सन्मानित
सौ. श्वेता विजय यांच्या शिक्षण सेवेतील 25 वर्षे आदर्शवत कार्यकाळात त्यांना आतापर्यंत विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
▪️रोटरी क्लव मालवण ‘नेशन बिल्डर ॲवॉर्ड २०२२
▪️ पंचायत समिती मालवण आदर्श शिक्षिका पुरस्कार – २०२१
▪️लायन्स व लायनेस क्लन शाखा मालवण – आदर्श शिक्षिका पुरस्कार २०१७)
▪️ मा. श्री. दिपकभाई केसरकर मित्रमंडळ – शिक्षक सेवा पुरस्कार २०१७
▪️अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण उत्कृष्ट कथानिवेदिका पुरस्कार
▪️अखिल भारतीय नाट्य परिषद – मुंबई – उत्कृष्ट नाट्य अभिवाचन पुरस्कार
▪️शिल्पकार मनोहर रोडगे कला पुरस्कार
▪️दिवंगत सत्यभामाबाई शिवडावकर आदर्श कक्षा गौरव पुरस्कार
▪️ कै. रजनी किनरे स्मृती कर्तुत्वान महिला पुरस्कार २०१७
▪️ मालवणी संस्कृती व वारसा मंडळ मालवण यांचा जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार २०२०
▪️ सेवेते सामाजिक प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांचा ‘सन्मान २०२२’


अशी पुरस्कारांची यादी मोठी आहे. विविध पुरस्कारप्राप्त अष्टपैलू व्यक्तिमत्त्व सौ. श्वेता विजय यादव मॅडम यांचे शिक्षकी पेशासह कला व सामाजिक क्षेत्रातील कार्य आदर्शवत व मालवण वासीयांना अभिमानास्पद असेच आहे.
पती पोलीस सेवेच्या माध्यमातून राज्याच्या विविध भागात सेवेत असताना मॅडमनी घर संसार मुलांचे शिक्षण ही जबाबदारी पतीच्या खंबीर पाठिंब्यावर समर्थपणे सांभाळली. शिक्षकी पेशातील या नवदुर्गेला प्रणाम.
मॅडम, आपली भावी वाटचालही विविध मान सन्मान, पुरस्कार यांनी बहरत राहो. स्काय न्यूज टुडे परिवाराच्या वतीने आपल्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.

