लाखों रुपयांचे नुकसान : 40 मच्छीमार कुटुंबांचा उदरनिर्वाह असलेला रापण संघ मोठया संकटात
मालवण : मालवण तालुक्यातील तोंडवळी तळाशील येथे अग्नि तांडवात तेरेकर रापण संघांचे लाखोंचे नुकसान झाले. रापण संघाच्या होड्याना सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. होड्या ठेवण्याच्या मांगरीतील होड्या जळून खाक झाल्या. स्थानिक मच्छिमार व ग्रामस्थ यांनी धाव घेत आग विझवण्यासाठी अथक प्रयत्न केले मात्र आग भडकतच होती. होड्या व साहित्य जळून खाक झाले. 20 लाखा पेक्षा जास्त नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून नुकसान वाढण्याची शक्यता आहे.

सुमारे 40 मच्छीमार कुटुंबांचा उदरनिर्वाह हिरावला आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
सोमवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास तळाशील रस्त्यालगत असलेल्या होड्या ठेवण्याच्या मांगरिकडे आग लागल्याचे रस्त्यावरून जाणाऱ्या पर्यटकास दिसल्याने त्यानी ग्रामस्थ यांच्या निदर्शनास आणून दिले. आग लागल्याचे समजताच ग्रामस्थांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र किनाऱ्यावरून वाऱ्याचा वेग असल्याने आग भडकत राहिली. सारे काही जळून गेले. अनेक मच्छीमार कुटुंबांचा संपूर्ण उदरनिर्वाह यावर अवलंबून होता. रापणी मासेमारी हे कुटुंबांचे एकमेव उत्पन्नाचे साधन असून होड्या व इतर साधने नष्ट झाल्याने त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक कुटुंबांमध्ये वृद्ध, महिला व शिक्षण घेत असलेली मुले असून आता त्यांच्या दैनंदिन खर्चासह शिक्षण व कर्जफेडीचा भार कसा पेलायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने तातडीने मदत न केल्यास या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता मच्छीमारांनी व्यक्त केली आहे. आगीत जळालेल्या होड्यांपैकी दोन होड्या नुकत्याच नव्याने तयार करण्यात आल्या होत्या. या होड्यांवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला होता. त्या पूर्णपणे जळून खाक झाल्याने नुकसानाचे प्रमाण वाढले असून पारंपरिक रापण संघाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. नवीन होड्या तयार करण्यासाठी संघातील सदस्यांनी आर्थिक ओढाताण करून बनवल्या होत्या. मात्र उत्पन्न मिळण्या अगोदरच आगीत नष्ट झाल्याने रापण संघासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
आगीचा भडका

मात्र वाऱ्यामुळे आग भडकत होती. स्थानिक मच्छीमार व ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत होड्या, इतर साहित्य जळून खाक झाले. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. रापणी मासेमारीवर अवलंबून असलेल्या मच्छीमार कुटुंबांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. आगामी मासेमारी हंगामावरही याचा गंभीर परिणाम होणार आहे. या आगीत होडी ठेवण्याच्या मांगरीत दोन होड्या, फायबरची पात, 200 किलो वाजणाचे नायलॉन रोप, होड्या ओढताना वापरल्या जाणाऱ्या पाच उंडली असे एकूण सामान होड्या ठेवण्याच्या मांगरीत होते हे सर्व सामान जळून खाक झाले. यात दोन होड्या, एक फायबर पात, रोप, उंडली असे मिळून 10 ते 20 लाखाचे साहित्य, तसेच मांगरीचे नुकसान झाले. नुकसानीचा आकडा अधिक वाढण्याची शक्यता आहे.

