मालवण : मालवणचे अग्र नामांकित ग्रामदैवत देऊळवाडा येथील श्री देव नारायण प्रतिवार्षिक त्रिपुरारी पौर्णिमा जत्रोत्सव आज बुधवार 5 नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे.

त्रिपुरारी पौर्णिमा जत्रोत्सव व दिपोत्सव यादिवशी दुपारी समाराधना रात्री १० वाजता पुराणवाचन सांगता नंतर दिपोत्सव. मंदिर व मंदिराच्या कळसांवर कोहाळ्याचे दिवे करून श्री देव नारायण, श्री देवी पावणाई, श्री देवी भावई, श्री देव रामेश्वर, श्री देवी सातेरी या पाचही मंदिरावर दिप लावून दिपोत्सव साजरा होतो. त्यानंतर पालखी प्रदक्षिणा व मिरवणुक केली जाते. रात्रौ १२.०० वाजता गोरेदशावतारी मंडळाचे नाटक व पहाटे दहीहंडी वगैरे देवस्थानचे कार्यक्रम आहेत. या कार्यक्रमाला रात्री ९.०० वाजता सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन शिवाजी महाराजांचा राजदंड (चांदीचा) या उत्सवाला किल्ल्यावरील मानकरी वाजत-गाजत किल्ल्यावरून घेऊन येण्याची प्रथा आहे. ते उत्सव समाप्तीनंतर सकाळी मानाचे श्रीफळ (प्रसाद) घेऊन मार्गस्थ होतात. तरी या उत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा व उत्सवाची शोभा वाढवावी अशी नम्र विनंती देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आली आहे.


