स्थानिकांच्या मदतीने युथ बीट्स फॉर क्लायमेट संस्थेच्या सदस्यांनी सुखरूप खोल समुद्रात सोडले
राहुल जाधव | मालवण : मालवण दांडी किनारी आलेल्या पटेरी डॉल्फिन ला स्थानिकांच्या मदतीने युथ बीट्स फॉर क्लायमेट या संस्थेच्या सदस्यांनी
सुखरूप खोल समुद्रात सोडत जीवदान दिले आहे.
रात्रीची ८ ची वेळ होती. अक्षय रेवंडकर आणि भार्गव खराडे दांडी मालवण किनाऱ्याच्या दिशेने चालले होते. अक्षयला चंदू खोबरेकर यांनी विचारले डॉल्फिन बघायला चाललास का? अक्षय चमकला डॉल्फिन, कुठे आहे? किनाऱ्यावर? अक्षय आणि भार्गव तडक किनाऱ्याकडे निघाले त्यांच्या सोबत राका रोगे, भाई जाधव दोघेही निघाले. त्यांनी बघितले गुडघ्याभर पाण्यात डॉल्फिन पहुडला होता. पपी तोडणकरची बोट जवळच होती पप्पी म्हणाला अरे मी आत्ताच त्याला कंबरभर पाण्यात सोडले होते परत तो किनाऱ्यावर आला परत प्रशांत तोडणकर आणि रोहित मालंडकर यांनी डॉल्फिनला जरा जास्त पाण्यात सोडले पण डॉल्फिन परत किनाऱ्यावरच आला. अक्षयने निरखून पाहिले हा पट्टेदार डॉल्फिन. खोल समुद्रात वास्तवास असणारा डॉल्फिन किनाऱ्यावर आला होता.

गडद रंगाची छाया असणारा डॉल्फिन त्याचे पोट पांढरे त्याच्यावर काळा रंगाचा पट्टा होता. त्याचे तोंड छोटेसे होते आणि काळी चोच होती. डॉल्फिन वर तोंड करून श्वास घेत होता. राका रोगे, भाई जाधव दोघेही त्या डॉल्फिनला ढोपरभर पाण्यात पकडून उभे होते. यावेळी त्याठिकाणी पर्यटक गर्दी करत होते. फोटो काढत होते. अक्षय आणि भार्गव पर्यटकांच्या जवळ जाऊन त्यांना जरा दूर राहा, बॅटरी बंद करा अशा सूचना सातत्याने करीत होते. अक्षयने वनविभागाला फोन केला. तसेच दर्शन वेन्गुर्लेकर यांना फोन केला. दर्शनने वन अधिकारी श्री.सुतार सरांना फोन लावला. सुतार सर आणि दर्शन यांच्यात चर्चा झाली. वनखात्याची टॅंक तारकर्लीला होती. ती इथपर्यंत आणावी तर टेम्पो बघायला हवा या सगळ्याला तासभर तरी वेळ जाणार. दर्शन, भार्गव, अक्षय अस्वस्थ होत होते.
तेवढ्यात त्यांना समजले की सकाळी हाच डॉल्फिन आब्राव राॅड्रीग्ज या स्कुबा ड्रायवर ला देवबागला मिळाला होता त्याने त्याला समुद्राच्या पाण्यात सोडले होते. तोच डॉल्फिन संध्याकाळी वायरी येथील आबा वाघ यांना मिळाला होता. त्यानेही त्याला समुद्रात सोडले होते. डॉल्फिन वारंवार किनाऱ्यावर का येतोय? त्याला काही दुखापत झाली असेल का? वेगवेगळे विचार अक्षय, भार्गव, दर्शन या आमच्या युथ बीट्स फॉर क्लायमेट या संस्थेच्या सदस्यांचा डोक्यात घोळत होते.
यादरम्याने वन खात्याचे केदार पालव, एक वनमजूर आणि ड्रायव्हरही आले. डॉल्फिनचे काय करावे याचा निर्णय होत नव्हता. मालवणात मार्गदर्शन करायला पशुवैद्यकीय अधिकारी, सागरीतज्ञ नाहीत. पशुवैद्यकीय डॉक्टर दिनेश विनेरीकर हे अक्षयच्या परिचित होते. ते डहाणूला राहतात दर्शन ने थेट त्यांना फोन लावला. त्यांनी सांगितले की या डॉल्फिन ला खोल समुद्रात सोडले पाहिजे तर त्याची जगण्याची शक्यता जास्त आहे. अक्षय म्हणाला वन खात्याने सांगावे काय करावे? केदार पालव यांनी आपल्या सोबत स्ट्रेचर आणले होते. शेवटी दर्शन, अक्षय, भार्गव, संजय, साहिल, राहुल व इकोमेट्स चे सदस्य या सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला की वन खात्याची परवानगी असेल तर या डॉल्फिनला खोल समुद्रात सोडूया. त्याला स्ट्रेचरवर घातले. काळ्या पांढऱ्या रंगाची शेड असलेला डॉल्फिन तसा खूप शांत वाटत होता.

तेवढ्यात यतिन आचरेकर यांची पात (मासेमारी नौका) दहा वाव समुद्रात मासेमारीसाठी जाणार होती. त्याने डॉल्फिनला आपल्या पातीमध्ये घ्यायची तयारी दर्शविली. डॉल्फिन सोबत कोण जाणार? वन खाते शांतच होते. शेवटी दर्शन आणि अक्षय पातीत चढले. पात निघाली समुद्रात प्रचंड वारा होता. पात हालत होती. समुद्र उसळला होता. पात वर खाली होत होती. समुद्राचे पाणी सर्वांच्या अंगावर पडत होते. डॉल्फिन वर भिजलेला कपडा ठेवला होता. कोठारा खडकाच्या पुढे पात आली. पात साधारणतः 60 ते 70 फूट खोल पाण्यावर उभी होती. यतिन आणि अक्षयने हळुवारपणे डॉल्फिनला पाण्यात सोडले. डॉल्फिन झपाझप पोहू लागला. थोड्याच वेळात तो दूर निघून गेला. दर्शन ने आपल्या कॅमेरात हा प्रसंग चित्रित केला. एक मिशन यशस्वी केले याचा आनंद अक्षय आणि दर्शन दोघांनाही झाला होता. हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहत होता.

