सिंधुदुर्ग जिल्हा श्रमजीवी रापण मच्छिमार संघाची मागणी
मालवण : गेले ५ वर्षे जिल्ह्यातील पारंपारिक रापण व्यवसायाला उतरती कळा लागली असून जिल्ह्यातील जवळपास १०० च्या वर रापण मासेमारी करणाऱ्या संघांच्या रापण व्यवसायाची आजची परिस्थिती हलाखीची बनली आहे. आधुनिक पद्धतीने होणारी अतिरेकी मासेमारी व त्यामुळे निर्माण झालेला मत्स्यदुष्काळ, पाऊस व वादळसदृश्य परिस्थिती, समुद्राची बिघडलेली स्थिती अशा विविध संकटामुळे रापण मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. रापण व्यवसायाला कोणतेच शासकीय संरक्षण नसल्याने कर्जबाजारी रापण संघांचे भविष्य अंधकारमय दिसत आहे, त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपारिक रापण संघांना मत्स्यदुष्काळी आर्थिक सहकार्य मिळावे अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा श्रमजीवी रापण मच्छिमार संघाचे अध्यक्ष गंगाराम घाडी व सचिव दिलीप घारे यांनी सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

