लुडबे यांचे व्यक्त करण्यात आले आभार
मालवण : वायरी - तारकर्ली - देवबाग रस्त्यावरील खड्डे आणि मोठे चर यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि वायरी ग्रामपंचायतचे माजी सरपंच देवानंद लुडबे यांनी काहीसा दिलासा दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग मालवण यांस वारंवार लेखी पत्र देऊनही या रस्त्यावरील खड्डे व चर बुजवण्यात न आल्याने विशेषतः बुधवारी होणारा देव रामेश्वर, श्री देव नारायण पालखी सोहळा याच मार्गावरून जाणार असल्याने लुडबे यांनी तातडीने स्वखर्चाने हे काम हाती घेतले. .
खड्डे आणि चर अधिक धोकादायक बनले होते. नागरिकांच्या तक्रारी आणि मागणीनंतरही विभागाने कोणतीही कार्यवाही केली नाही. परिणामी, रस्त्यावरून प्रवास करताना अपघात होण्याची शक्यता वाढली होती. तसेच, येत्या बुधवारी देव रामेश्वर पालखी सोहळा याच रस्त्यावरून जाणार असल्याने, पालखीतील वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा आणि सोहळ्याच्या सुविधेचा प्रश्न उभा राहिला होता.
प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन देवानंद लुडबे यांनी स्वतः पुढाकार घेतला. स्वखर्चातून रस्त्यावरील खड्डे आणि चर बुजविण्याच्या कामाला सुरुवात केली. मार्गावरील अडथळा दूर झाला आहे.
लुडबे यांच्या या कामाबद्दल काही नागरिकांनी त्यांचे आभार मानले. नागरिकांच्या भावना व्यक्त करताना सांगितले की, "किती तरी दिवसांपासून आम्ही या खड्ड्यांमुळे त्रास सहन करत होतो. लुडबे साहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन हे काम केल्यामुळे आमची मोठी समस्या दूर झाली आहे. त्यांनी स्वखर्चातून केले, ही खूप मोठी गोष्ट आहे."
या लोकहिताच्या कामात देवानंद लुडबे यांना सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष मेघनाद धुरी, जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, बाळू अंधारी, श्रीकृष्ण तळवडेकर, वायरी उपसरपंच प्राची माणगावकर, गणेश पाडगावकर, पराग माणगावकर, सरदार ताजर, दिलीप तळगावकर, मेघश्याम लुडबे तसेच इतर पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून सक्रिय पाठिंबा दिला

