देवतांचा ग्राम प्रदक्षिणा सोहळा
भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावे : देवस्थान ट्रस्टच्यावतीने आवाहन
मंगेश नलावडे | मालवण : मालवणचे ग्रामदैवत श्री देव नारायण आणि श्री देव रामेश्वर यांचा ऐतिहासिक पालखी सोहळा बलिप्रतिपदा म्हणजे दीपावली पाडव्या निमित्त २२ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता सुरू होणार आहे. भाविकांनी यात मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावे,असे आवाहन श्री देव रामेश्वर,नारायण,सातेरी, देवस्थान ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.
मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण यांचा वार्षिक पालखी २२ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता श्री देव रामेश्वर मंदिर येथून निघून श्री देव नारायण श्री देवी पावणाई, श्री देवी भावई श्री देवी सातेरी या सर्व देवतांना सांगणे करून आडवणमार्गे तानाजी नाका, श्री देव भूतनाथ मंदिर येथे थांबून समुद्रमार्गे मोरेश्वर (मोरयाचा धोंडा) येथे थांबेल. त्यानंतर दांडेश्वर मंदिर येथून श्री देवी काळबादेवी मंदिर येथे थांबून जोशी मांड येथे येईल व त्यानंतर नगर वाचनालयाकडून सोमवार पेठेतील श्री देव रामेश्वर मांड येथे भाविकांच्या दर्शनासाठी प्रतिवर्षाप्रमाणे थांबून बाजारपेठ भरडमार्गे देऊळवाडा येथे मंदिरात येईल. तरी या पालखी सोहळ्याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान ट्रस्टतर्फे यांनी केले आहे.
पालखी सोहळ्यामुळे मालवण नगरीला जत्रेचे स्वरूप प्राप्त होत असते. दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी ग्रामदेवत रामेश्वर व नारायणाची पालखी प्रदक्षिणा तसेच रामेश्वर नारायण आणि त्यांची बहीण काळबादेवीचा पारंपरिक भाऊबीज सोहळा मोठ्या थाटात साजरा होत असतो. ग्रामदेवतांची पालखी सजविण्यात येत असते. भूतनाथ येथे पालखीसोबत आलेल्या मानकरी प्रजाजनांना बोडवे - गावकर यांच्याकडून श्रीफळ भेट देऊन स्वागत करण्यात येते. दुपारी एक वाजता रामेश्वर व नारायणाचे वर्सलदार कुटुंबीय आणि गावकर मानकरी रामेश्वरा समोर श्रीफळ ठेवून गाहाणे घालतात. ढोल-ताशांच्या गजरात रामेश्वर व नारायणाची पालखी मालवणच्या परिक्रमेसाठी बाहेर पडते. प्रारंभी रामेश्वर मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात येते. मोरयाचा धोंडा,श्री देव दांडेश्वर,बंदर जेटीपर्यंत समुद्रकिनारी भाविकांनी एकच गर्दी केली जाते. समुद्र किनाऱ्यावर बाबूची मंदिरे, देखावे साकारण्यात येतात. मच्छीमारांकडून श्री देव रामेश्वराचे उत्साहात स्वागत करण्यात येत असते. मोरयाचा धोंडा ते बाजारपेठ दरम्यान भाविकांची मोठी गर्दी असते. किनार पट्टी ठिकठिकाणी पताका लावून सजविण्यात येते.
ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण यांचा दीपावली निमित्त बुधवारी २२ रोजी दुपारी १ वा पासून रामेश्वर, नारायण, सातेरी मंदिर येथून सुरू होणार आहे. त्यानंतर देव भूतनाथ मंदिर (वायरी) देव मोरेश्वर (मोरयाचा थोडा मार्गे दांडेश्वर मंदिरात पोहोचणार आहे. ही पालखी समुद्र किनान्यामार्गे श्री देवी काळबादेवी मंदिर (मेढा), जोशी मांड येथून सोमवारपेठेतील रामेश्वर माड येथे येईल.या ठिकाणी रात्री पालखी दर्शनासाठी थांबेल. त्यानंतर ही पालखी बाजारपेठ भरडमार्गे देऊळवाडा मंदिरात जाईल.
यावर्षी पालखी सोहळ्याला मालवणात भाविकांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. पाऊसही गेलेला असल्याने आणि बाजारपेठांमध्ये उत्साह असल्याने आताचा पालखी सोहळा न भुतो न भविष्यती असाच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. देवस्थान ट्रस्टतर्फे सोहळा उत्साहात होण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात येत आहे. तर व्यापारी संघ आणि समस्त मालवणकरही हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करतात.
▪️अमित खोत | मालवण

