संघटन आणि कार्यकर्ता हीच भाजपाची ताकद
आगामी सर्व निवडणुकीत भाजपाचा विजय निश्चित
भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी व्यक्त केला विश्वास
भाजपात प्रवेश केलेल्या सर्वांचे मालवण भाजपाच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत
मालवण : संघटक, सूक्ष्म नियोजन आणि कार्यकर्ता ही भाजपाची ताकद आहे. भाजपा हा एक विचार आहे. त्यामुळे भाजपा सोबत जोडलेला प्रत्येकजण हा भाजपचाच होऊन जातो. शत प्रतिशत भाजपा या दृष्टीने भाजपाची वाटचाल सुरु राहील. मालवणात भाजपाची ताकद वाढत असून भाजपा विरोधात सगळे पक्ष जरी एकत्र आले तरीही भाजपाचा पराभव करू शकत नाहीत. कारण कार्यकर्त्यांचे बळ आणि जनतेचा विश्वास यावर भाजपचा विजय निश्चित होतो. असा विश्वास भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी व्यक्त केला.

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश भाजपा कार्यालय येथे मालवण नगरपरिषदेचे उबाठा गटाचे माजी नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, दर्शना कासवकर, सेजल परब, सन्मेष परब, भाई कासवकर, व अन्य पदाधिकारी यांनी भाजपात प्रवेश केला होता. या सर्वांचा मालवण शहर व तालुका भाजपच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मामा वरेरकर नाट्यगृह येथे आयोजित विशेष कार्यक्रमात हा सत्कार करण्यात आला.

यावेळी धोंडी चिंदरकर म्हणाले, भाजपा संघटन मजबूत होत असताना होऊ घातलेल्या आगामी निवडणुका लक्षात घेता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजपा नेते खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ जो निर्णय देतील त्यानुसार आपण कार्यरत राहू. सध्यस्थितीत जागा वाटप किंवा उमेदवार निश्चिती झाली नाही. सर्व निर्णय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घेतले जातील. मात्र, भाजपा म्हणून निश्चितच आमची ताकद वाढलेली आहे. असेही धोंडी चिंदरकर यांनी ठामपणे सांगितले.


यावेळी पक्ष संघटना, पक्षाची ध्येय धोरणा बाबत विलास हडकर यांनी मार्गदर्शन केले. तर जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनीही विचार मांडतांना आगामी प्रत्येक निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकतच राहील असा विश्वास व्यक्त केला. तसेच भाजपात प्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत केले.


कोणतीही अपेक्षा नाही, दिलेली जबाबदारी पार पाडू
यावेळी मंदार केणी, यतीन खोत व सहकारी यांनी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. भाजपा पक्षात प्रवेश केल्या नंतर आम्हाला जो मान सन्मान मिळाला, त्याबद्दल आम्ही कायम ऋणी राहू. कोणत्याही अपेक्षेने आम्ही प्रवेश केला नाही. वरिष्ठ जी जबाबदारी देतील ती पार पाडली जाईल. विकास आणि हिंदुत्व यावर काम करणारा भाजपा पक्ष आणि संघटनात्मक असलेले सूक्ष्म नियोजन पाहता भाजपाचा विजय आगामी निवडणुकात निश्चित आहे असेही त्यांनी सांगितले. तर भाई कासवकर म्हणाले, आता यापुढे कोणत्याही पक्षात प्रवेश नाही. भाजपाच हा शेवटचा पक्ष आहे. यापूढे सर्वकाही भाजपासाठीच असल्याचे सांगितले. सेजल परब यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत त्यावर प्रेरीत होऊन पक्ष प्रवेश केल्याचे सांगितले.


शत प्रतिशत भाजपा दृष्टीने ताकद वाढत आहे : मोंडकर
मालवण शहरात भाजपाची ताकद वाढली आहे. मागील टर्म मध्ये नगरसेवक म्हणून असलेले 14 जण आता भाजपासोबत आहेत. वाढत असलेली ही ताकद पाहता आगामी 20 ही नगरसेवक विजयी होतील अशी स्थिती आहे. मात्र, याबाबत आगामी निवडणुकीचे सर्व निर्णय वरिष्ठ घेतील. असेही शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी सांगितले.
▪️ अमित खोत | मालवण

