शिक्षकी पेशातील मातृत्व
३६ वर्षांचा आदर्शवत सेवाकाळ
मालवण : काही माणसे जन्माला येतात ती समाजासाठी. स्वार्थ हा त्यांच्यात नसतोच असते ती फक्त आपुलकी आणि सेवाभावी वृत्ती. त्यांची प्रत्येक कृती ठरवून नसली तरी ती सेवाकार्य स्वरूप होते. होय ही माणसे दैवत्व लाभलेली असतात असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. आपल्या मालवण मधील असेच एक व्यक्तिमत्व सौ. सुविधा नरेंद्र तिनईकर या होय.
टोपीवाला ज्युनिअर कॉलेजच्या व्यवसाय अभ्यासक्रम विभागातील मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंटच्या शिक्षिका सौ. सुविधा नरेंद्र तिनईकर यां ३६ वर्षांची सेवा पूर्ण करत नुकत्याच सेवा निवृत्त झाल्या. मात्र त्यांच्या बद्दल व्यक्त होताना सहकारी शिक्षक, विद्यार्थी, नागरिक यांना शब्द अपुरे पडले. असेच चित्र गेल्या काही दिवसात सातत्याने दिसून आले.
३० जून रोजी त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त मालवण एज्युकेशन सोसायटीतर्फे सत्कार समारंभाचे आयोजन टोपीवाला हायस्कूलच्या सभागृहात करण्यात आले. मालवण एज्युकेशन सोसायटी व शाळा- कॉलेज तर्फे त्यांच्या प्रदीर्घ सेवेबद्दल मानपत्र, शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
मॅडमचे माजी विद्यार्थी व विविध सामाजिक संस्थांनी पुष्पगुच्छ देत त्यांना मानाचा मुजरा केला. त्यानंतर मालवण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. विजय कामत, शालेय समिती अध्यक्ष श्री. शैलेश खांडाळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. वळंजू सर यांनी करत त्यांच्या कार्याचा आढावा घेत शुभेच्छा दिल्या. सौ. तांबे मॅडम, सौ. रावराणे मॅडम, सौ. धामापूरकर मॅडम, सौ. करंजेकर मॅडम, पर्यवेक्षक श्री. वेरलकर सर यांनी मनोगत व्यक्त करत त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त केला.
तिनईकर मॅडम विद्यार्थ्यांसाठी मातृत्व अर्थात पालक म्हणून होत्या तश्याच त्या सहकारी शिक्षक, शिक्षिका यांसाठी ही वात्सल्य रूप होत्या. अनेक शिक्षिका यांनी आपल्या जिवन प्रवासात तिनईकर मॅडमची असलेली साथ आणि भक्कम आधार स्पष्ट केला. खऱ्या अर्थाने तिनईकर मॅडम विद्यार्थ्यांसाठी पालक होत्या तश्याच त्या सहकारी शिक्षिकांसाठी ही मातृत्वचं होत्या आणि कायम राहतील हे अनेकांच्या हृदयस्पर्शी भावनातून स्पष्ट होते.
तिनईकर मॅडम या उच्चशिक्षित व्यक्तिमत्व. हुशारी, परफेक्टपणा, आत्मविश्वास, खंबीरता आणि नेतृत्वगुण या सर्व गोष्टी त्यांचे कर्तृत्व आणि अष्टपैलु पणा सिद्ध करणाऱ्या ठरल्या. अनेकांनी आपल्या भाषणातून या सर्व भावना व्यक्त केल्या.
सत्काराला उत्तर देताना मॅडम भावूक झाल्या. गोड आठवणींना उजाळा देत विद्यार्थी व सहकाऱ्यांचे आभार मानले.
१९८९ च्या पहिल्या बॅचपासून अनेक माजी विद्यार्थी, पत्रकार, क्लबचे पदाधिकारी, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. मयूरा भिसे यांनी केले तर आभार सौ. अपूर्वा देसाई यांनी मानले.
▪️अमित खोत | मालवण
.....................................

