यापूर्वी १६ जुलै रोजी दुसरा संशयिताला पोलिसांच्या ताब्यात
कुडाळ पोलिसांची कामगिरी
कविलकाटे येथील गांजा प्रकरणाचे वेंगुर्ले कनेक्शन
निलेश जोशी | कुडाळ : कुडाळ - कविलकाटे रायकरवाडी येथील गांजा प्रकरणातील तिसऱ्या संशयित प्रितेश रोहीदास मसुरकर (32 रा. उभादांडा - कुर्लेवाडी ,वेंगुर्ले ) याला शनिवारी सकाळी कुडाळ पोलिसानी उभादांडा येथील त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या घराची झडती घेतली असता, पोलिसांना सुमारे 150 ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. तो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी संशयित प्रितेश याला 20 जुलै रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.
कुडाळ - कविलकाटे रायकरवाडी येथील विशाल सुरेश वाडेकर याच्या घरावर कुडाळ पोलिसांनी 4 जून रोजी छापा टाकून एक किलो 680 ग्रॅम वजनाचा व 52 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला होता. त्याला ताब्यात घेत गांजा बाळगळ्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. विशाल वाडेकर याने आपल्या घरी गांजा विक्रीसाठी आणल्याची बातमी कुडाळ पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी वरिष्ठांच्या आदेशान्वये तेथील कविलकाटे रायकरवाडी येथे संशयित विशाल यांच्या राहत्या घरी छापा टाकून कारवाई केली होती. विशाल याला ताब्यात घेत अटक केले होते. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी दिली होती. पोलीस
निरीक्षक श्री मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक प्रवीण धडे करीत आहेत. पोलीस कोठडीत असताना विशाल याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार केतन आनंद सुकी ( 30 , रा.वेगुर्ले ) या दुसऱ्या आरोपीला 16 जुलै रोजी कुडाळ पोलिसांनी ताब्यात ताब्यात घेत अटक केली होती. याप्रकरणी त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. तो सध्या पोलीस कोठडीत आहे. उपनिरीक्षक श्री. धडे यांनी केलेल्या तपासकामात संशयिताची नावे पुढे येत आहेत. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार कुडाळ पोलिसांच्या पथकाने आज सकाळी उभादांडा - वेंगुर्ले येथील प्रितेश मसुरकर यांच्या राहत्या घरी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी घेतलेल्या झडतीत त्याच्या घरी दीडशे ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. याबाबतची कार्यवाही सुरू होती.

गांजा प्रकरणातील तिसऱ्या संशयिताला उभादांडा येथून अटक
