मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुकळवाड येथील जयवंती बाबू फाऊंडेशन संचालित एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयात आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक युवा कौशल्य दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
युवकांना कौशल्य विकासाचे महत्त्व पटवून देत त्यांना उद्योजक बनण्यासाठी प्रेरित करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सिंधुदुर्ग विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. भैय्याजी येरमे आणि एम.आय.टी.एम. संस्थेच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला अनेक मान्यवर आणि अधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे अधिकारी श्री. अमित तडवी, श्री. सुरज देबाजे, श्री. नामदेव सावंत, तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्री. रविंद्र पत्की आणि अप्रेंटिसशिप अॅडव्हायझर सिंधुदुर्गचे श्री. उमेश कुलकर्णी यांचा समावेश होता. एम.आय.टी.एम. संस्थेचे विश्वस्त श्री. विनोद कदम, सौ. वृषाली कदम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. अशोक सावंत, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे प्राचार्य डॉ. एस.व्ही. ढणाल, डिप्लोमा प्राचार्य श्री. विशाल कुशे, उपप्राचार्या सौ. पूनम कदम आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विध्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हाधिकारी माननीय श्री. अनिल पाटील यांनी विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे महत्त्व समजावून सांगितले. आपल्या भाषणात ते म्हणाले, "कौशल्य म्हणजे काय हे अजूनही आपल्या आजूबाजूच्या अनेक लोकांना माहीत नसते. त्यामुळे त्यांच्या जीवनात कौशल्याची जाणीव करून देणे अत्यंत आवश्यक आहे." सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्यटनप्रधान स्वरूप अधोरेखित करताना ते म्हणाले की, कुशल मनुष्यबळाच्या माध्यमातून श्रमाची बचत करता येते आणि कोणतेही काम सहजपणे व प्रभावीपणे करता येते. लोकांना चांगल्या सेवा देण्यासाठी प्राविण्य मिळवणे महत्त्वाचे आहे.
श्री. पाटील यांनी विद्यार्थ्यांना केवळ नोकरी शोधणारे नोकर न बनता, कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वतःचे रोजगार उभे करून उद्योजक बनण्याचे आवाहन केले. "एम.आय.टी.एम. महाविद्यालयाचे वातावरण विद्यार्थ्यांना उद्योजक घडवण्यासाठी अत्यंत योग्य आहे. विद्यार्थ्यांनी विविध उद्योगांमध्ये उतरून भविष्यात आपल्या महाविद्यालयाचे नाव मोठे करावे," असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्याचा आणि पर्यायाने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा शेतकऱ्यांसह सर्वांना फायदा होईल अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी काम करावे, असे मार्गदर्शनही त्यांनी केले.

या कार्यक्रमास जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्री. रविंद्र पत्की देखील उपस्थित होते. त्यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या कार्याबद्दल आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली. रोजगार आणि स्वयंरोजगार या रोजगाराच्या दोन महत्त्वाच्या बाजू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. "रोजगार म्हणजे तुम्ही स्वतः रोजगार शोधणार आहात आणि स्वयंरोजगार म्हणजे तुम्ही स्वतः रोजगार देणार आहात," असे ते म्हणाले. जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजनांचा लाभ घेऊन विद्यार्थी कसे स्वयंरोजगार निर्माण करू शकतात, यावर त्यांनी प्रकाश टाकला.
श्री. पत्की यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कृषी उत्पादनांवर आधारित उद्योगांवर भर देण्यास सांगितले. नारळ, कोकम, काजू, आंबा, सुपारी यांसारख्या स्थानिक उत्पादनांपासून विविध उत्पादने तयार करून अधिक उत्पन्न मिळवता येते, असे त्यांनी सुचवले. "शेतीला तंत्रज्ञानाची जोड देणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही असे करत असाल, तर आमचे केंद्र तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन आणि मदत करेल," असे आश्वासन त्यांनी दिले. कोणतेही काम लहान नसते आणि त्यातूनच मोठे यश मिळते, असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना आजच आपली दिशा निश्चित करण्याचे आवाहन केले.

जिल्हा कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्राचे अधिकारी श्री. सुरज देबाजे यांनी विद्यार्थ्यांना कौशल्य विकास केंद्राच्या विविध योजनांची माहिती दिली. मुख्यमंत्री युवा योजना, दीनदयाळ उपाध्याय योजना यांसारख्या योजनांमधून रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होऊ शकतात, हे त्यांनी समजावून सांगितले. ग्रंथालय सदृश्य अभ्यासिका, बेरोजगार सेवा अभ्यासिका, आणि सहकारी तत्त्वावर शासनमान्यता देणाऱ्या योजनांबद्दलही त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली, जेणेकरून त्यांना करिअर घडवण्यासाठी मदत मिळेल.
- संस्थेचे विश्वस्त श्री. विनोद कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विकासाच्या वेगाला साथ द्यायची असेल, तर पर्यटनाच्या दृष्टीने अभियांत्रिकी ज्ञानाचा वापर करून औद्योगिक विकास साधता येईल. यामुळे बेरोजगारीची संख्या कमी करता येईल. "आपल्या महाविद्यालयातून तयार होऊन जाणारा प्रत्येक इंजिनियर सक्षम असावा, यासाठी तुम्ही कौशल्य विकासाच्या योजनांचा लाभ घेणे आवश्यक आहे. युवा बेरोजगारीची संख्या कमी करून रोजगाराची विचारसरणी वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे," असे ते म्हणाले.
एम.आय.टी.एम. महाविद्यालयाच्या ऐश्वर्या पालव आणि दर्पण गावडे या विद्यार्थ्यांनी जागतिक युवा कौशल्य कार्यक्रमाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी या कार्यक्रमातून मिळालेल्या प्रेरणा आणि ज्ञानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि एम.आय.टी.एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.व्ही. ढणाल यांनी विद्यार्थ्यांना जागतिक युवा दिनाचे महत्त्व सांगितले. "आताचे युग हे डिजिटल युग आहे. त्याचा वापर करा आणि नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उद्योजक होण्यासाठी आज ही संधी चालून आली आहे. याचा तुम्ही फायदा करून घ्या," असे आवाहन त्यांनी केले. लोकसंख्या लाभांश आणि स्किलिंग इंडिया या विषयांवरही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले, जेणेकरून विद्यार्थ्यांना भारताच्या विकासात त्यांचे योगदान समजू शकेल.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे अधिकारी श्री. अमित तडवी यांनी केले. त्यांनी उपस्थित सर्व मान्यवर, अधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे विश्वस्त श्री. संतोष पाल, सौ. नेहा पाल आणि संचालक श्री. केतन कदम यांनी शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांना कुशल उद्योजक बनवण्यासाठी एक प्रेरणादायी ठरला, यात शंका नाही.

