नगरसेवक उदय मांजरेकर यांची न प कडे मागणी
निलेश जोशी | कुडाळ : नगरपंचायत हद्दीत विविध ठिकाणी मुक्तपणे फिरणाऱ्या गाय, बैल अशा मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी कुडाळ नगरपंचायतचे बांधकाम सभापती नगरसेवक उदय मांजरेकर यांनी नगरपंचायत प्रशासनाकडे केली आहे. तसे पत्र श्री. मांजरेकर यांनी मुख्याधिकारी यांना दिले आहे.
पत्रात उदय मांजरेकर यांनी म्हटले आहे, कुडाळ नगर पंचायत हद्दीत गाय, बैल, इत्यादी मोकाट जनावरे रस्त्यांवर मुक्तपणे फिरत आहेत. नगरपंचायत हद्दीमध्ये चालू आठवड्यामध्ये मोकाट जनावरांमुळे दोन ठिकाणी अपघात झाल्याच्या घटना घडून आलेल्या आहेत. मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच अपघात होण्याची शक्यता वाढली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेस तसेच स्वच्छतेस धोका निर्माण झाला आहे. तसेच या जनावरांमुळे सार्वजनिक ठिकाणी घाण साचत असून, आजार फैलावण्याचा धोका निर्माण झाला आहे. यावर तात्काळ कार्यवाही करणे आवश्यक आहे.
म्हणून विनंती करण्यात येते की, मोकाट जनावरांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात यावी. तसेच अशा जनावरांना पकडून सुरक्षित गोठ्यांमध्ये ठेवण्यात यावे. संबंधित जनावरांचे मालक सापडल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. जनजागृतीसाठी प्रचार व सूचना फलक लावण्यात यावेत. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने या जनावरांचे आरोग्य तपासण्यात यावे.
ही बाब आपल्या स्तरावर गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी उदय मांजरेकर यांनी केली आहे.

