१४ पैकी १२ जणांना प्रत्येकी १२००/- दंड
कारवाईबाबत नागरिकांतून समाधान
निलेश जोशी | कुडाळ : कुडाळ एमआयडीसी परिसरात असभ्य वर्तन करणाऱ्यांवर कुडाळ पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यातील बारा जणांना प्रत्येकी १२००/- रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. कुडाळ पोलिसांच्या या कारवाईबाबत नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत कुडाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुडाळ शहर परिसरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) आहे. हे ठिकाण शहरापासुन काहीसे बाजुस असल्याने सायंकाळच्या वेळी तसेच रात्रौ अपरात्रौ या भागातील बंद कंपन्यांचे निर्मनुष्य परीसरात काही इसम दारुच्या पाटर्या, मित्र मैत्रीणीसोबत मौजमजा करण्याचे प्रमाण वाढलेले होते. त्यामुळे या ठिकाणी एखादा गंभीर गुन्हा घडण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. अशा गैरप्रकार यांना रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग डॉ. मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती नयोमी साटम यांनी त्याची दखल घेवुन संबधीत ठिकाणी गस्त वाढवण्याबाबत आदेश दिलेले होते.
कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी एमआयडीसी परिसरात पोलीसांची गस्त वाढविली. त्या मुदतीत कुडाळ पोलीसांमार्फत एमआयडीसी परीसरात गस्त केली. त्यावेळी एमआयडीसी परीसरात असभ्य वर्तन करणारे राजेश किशोर चव्हाण (रा. नेरुर), साजीद लतिफ रहमान खुल्ली (रा. पिंगुळी), शुभम प्रकाश चव्हाण (रा. कुडाळ), प्रकाश आनंद रजपुत (रा. केळबाईवाडी कुडाळ), राजेंद्र लक्ष्मण साळकर (रा. साळेल मालवण), साईराज दत्तात्राय तेली (रा. कुडाळ), राहूल राजाराम पाटील (रा. कुडाळ कुंभारवाडी), ओंकार विजय पांचाळ (रा. पिंगुळी), अनिरुद्ध विश्वास गवंडे (रा. पिंगुळी), आसिफ आदम शेख (रा. नेरुर), संदेश सुभाष सावंत (रा. आंदुर्ले) प्रविण गणपत सावंत (रा. ओरोस), सुशांत सुभाष सावंत (रा. आंदुर्ले) केतन चंद्रकांत चव्हाण (रा. पिंगुळी) असे १४ इसम मिळून आले.
त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११०/११७ प्रमाणे पोलीसांनी कारवाई करुन खटले प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी, कुडाळ यांचे न्यायालयात पाठविण्यात आले. मा. न्यायालयाने या इसमांपैकी १२ इसमांना प्रत्येकी १२००/- रु प्रमाणे दंड केलेला आहे.
पोलीसांच्या अशा कारवाईमुळे या भागातील चोऱ्यांच्या तसेच इतर गैरप्रकारामध्ये घट झाल्याचे दिसुन येत आहे. या कारवाईत कुडाळ पोलीसांकडून सातत्य ठेवण्यात येणार असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले.

