गुरूवर्य का.आ.सामंत यांचा सत्कार
निलेश जोशी | कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये गुरू पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. क.म.शि.प्र.मंडळाचे उपाध्यक्ष गुरूवर्य का.आ.सामंत यांचा गुरू पौर्णिमेच्या औचित्याने महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.स्मिता सुरवसे यांच्या हस्ते गुरू आदराने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ.मंगेश जांबळे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. तसेच दृष्टांत कथेमधून गुरू महती सांगितली. प्रमुख अतिथी का.आ. सामंत यांच्या हस्ते दीप प्रज्ववलन करून तसेच सरस्वती देवी व संत राऊळ महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.
गुरुवर्य का.आ. सामंत यांनी आपल्या मनोगतामधून भारतीय संकृती परंपरेचे सामर्थ्य दर्शविले. आजचा दिवस व्यास पौणिमा म्हणूनही ओळखला जातो, व्यासांचे प्राचीन ग्रंथामध्ये अनन्यसाधारण योगदान कसे आहे याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. रामायण, महाभारतामधील काही प्रसंग त्यांनी यावेळी सांगितले व व्यासांच्या कार्यावर प्रकाश टाकत प्राचीन भूतकाळातीला घटनांचे वर्तमान काळातही तात्पर्य कसे ध्यानात घ्यावे याबद्दल ते बोलले. तसेच भारतवर्षाचा इतिहास,वेद, पुराणे, युद्ध आदी संदर्भानेही त्यांनी चर्चा केली.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.स्मिता सुरवसे यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदी गुरुंना वंदन करून गुरूंच्या काही आठवणी सांगितल्या व सर्वांना शुभेच्छा दिल्या.
प्रमुख अतिथी का.आ.सामंत यांचा परिचय प्रा.संतोष वालावलकर यांनी तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. आर.वाय. ठाकूर यांनी केले. आभार प्रा. जकिरा राजगुरू यांनी मानले.

