मालवण : मालवण तालुक्यातील कालावल खाडीत कायदेशीर वाळू लिलावाची मुदत ९ जून २०२५ रोजी संपली असतानाही, खाडीत दिवस-रात्र राजरोसपणे अनधिकृत वाळू उत्खनन सुरू आहे. याबाबत मसुरे कावावाडी येथील रहिवासी अनिल अच्युत मसुरकर यांनी प्रशासनाकडे तक्रार निवेदन दिले आहे. तहसीलदार, मालवण यांच्याकडे पाठवलेल्या पत्रात तीव्र नाराजी व्यक्त केली तसेच पुला पासून काही अंतरावर सुरु असलेल्या वाळू उतखन्नन मुळे पुलास धोका निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
श्री. मसुरकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, कायदेशीर मुदत संपूनही मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन सुरू आहे. याबाबत वेळोवेळी तक्रारी अर्ज देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होताना दिसत नाही. "आपण सदर अनधिकृत बोटींवर कार्यवाही न करण्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत? ती जनतेसमोर मांडावीत," असा रोख ठोक सवाल त्यांनी तहसीलदारांना विचारला आहे.
प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, मसुरकर यांनी म्हटले आहे की, "यंत्रणा सक्षम करण्याबाबत आपले म्हणणे असेल तर ती कृपया कळवावी, कारण हा विषय न संपणारा आहे. एक दिवस आपण दोन डंपर पकडता त्याची मोठी बातमी आपण देता. आणि महिन्याचे इतर दिवस एकही कार्यवाही होत नाही. यामागील नेमके कोणते कारण आहे ते आम्हाला समजून घ्यायचे आहे."
"तुम्ही आमची म्हणजेच जनतेची सेवा, निसर्गाचे रक्षण करणे करिता आहात. गाडी नाही ?, किवा पोलिस कमी आहेत कारवाई करायला किवा अजून काही कारण असेल तर कृपया कळवावे,"
या अवैध उत्खननामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत असल्याकडेही मसुरकर यांनी लक्ष वेधले आहे. यावर सविस्तर लेखी उत्तर लवकरात लवकर द्यावे अशी विनंती त्यांनी केली आहे, जेणेकरून हे प्रकरण लोकप्रतिनिधींमार्फत मंत्रालयात मांडता येईल किंवा न्यायालयात दाद मागता येईल.
पावसाळा सुरू असून, ही अवैध वाहतूक अशीच चालू राहिल्यास गणेशोत्सवात गणेश मूर्ती आणतानाही धोका निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. श्री. मसुरकर यांनी पुढील दहा दिवसांत उत्तराची अपेक्षा केली आहे.

