'त्या' बसवलेल्या सिमेंट काँक्रिट लाद्यांमुळे त्रासाला सामोरे जावे लागणार
मालवण शहर देऊळवाडा येथील नागरिकांचे मुख्याधिकाऱ्यांना तक्रार निवेदन
मालवण : मालवण शहर देऊळवाडा येथील नंदू माणगावकर घर ते आडारी मेन रोड पर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे व गटार बांधणे यातील गटारावरील लाद्या बसवणे हे काम चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याची तक्रार देऊळवाडा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. योग्य पद्धतीने काम करण्यात यावे, असे तक्रार निवेदन देऊळवाडा येथील नरिकांच्या वतीने मालवण नगरपरिषद प्रशासनास देण्यात आले आहे.सदर निवेदनात म्हटले आहे की, देऊळवाडा येथील नंदू माणगावकर घर ते आडारी मेन रोड पर्यंत गटार बांधणे व रस्ता कॉंक्रिटीकरण करणे हे काम सुरू आहे, पण हे काम चुकीच्या पद्धतीने करण्यात येत आहे.
काम करताना १ फुट रुंदीच्या लाद्या बसवण्यात याव्यात असे संबंधित यंत्रणेला काम चालू करताना ग्रामस्थांनी सांगितले होते, तरी देखील ३ फूट रुंदीच्या लाद्या बसवल्या आहेत. या लाद्यांना हूक देखील नाही. मोठ्या पावसात डोंगरावरून मोठा पाण्याचा प्रवाह असतो. त्या प्रवाहासोबत मोठ्या प्रमाणात माती व दगड वाहून येतात, त्यामुळे कालांतराने गटार बंद होऊ शकते व गटारा खालील पाण्याची पाईपलाईन फुटून जाण्याची शक्यता आहे. तर ही पाईपलाईन दुरुस्त करताना व गटार साफ करताना हे ३ फूट च्या लाद्या उचलताना अवजड होणार तरी या कामाची पाहणी करून १ फूट लांबीच्या लाद्या बसून द्याव्यात. अशी मागणी करण्यात आली आहे. अशी माहिती अक्षय माणगावकर यांनी दिली.
यावेळी अक्षय माणगावकर यांसह किरण चव्हाण, गणेश गावकर, रमाकांत माणगावकर, गौरव सोनावडेकर, अक्षय माणगावकर, रुपेश कोकरे, गणेश चव्हाण, उमेश चव्हाण, सुरेंद्र वालावलकर, राजन गावकर, अमित बोर्डवेकर, सत्यवान चव्हाण तसेच अन्य नागरिक उपस्थित होते.

