मिली मिश्रा | कणकवली : कणकवली शहरालगत असून तसेच महामार्गावरील गाव असूनही वागदे येथे गेल्या सुमारे वर्षभरापासून मोबाईल नेटवर्कची समस्या आहे. बीएसएनएल वा अन्य कोणत्याही कंपनीचे नेटवर्क मिळत नसल्याने अत्यावश्यकप्रसंगी मोठी समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे याबाबत तातडीने मार्ग काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
वागदे येथे उभारण्यात आलेल्या टॉवरवरून बीएसएनएलसह जिओचे नेटवर्क मिळत होते. मात्र, वर्षभरापूर्वी हा टॉवर काढण्यात आला. त्यानंतर आतापर्यंत या ठिकाणी टॉवर उभारलेला नाही. वागदे हा गाव कणकवली शहरापासून जवळ असून सष्ट्रीय महामार्ग ६६ वर आहे. अनेकदा या ठिकाणी अपघात अथवा आपत्कालीन स्थिती निर्माण होते. अशावेळी मोबाईल नेटवर्क असणे आवश्यक असते. तसेच वैद्यकीय इर्मजन्सी तसेच विद्यार्थ्यांनाही शैक्षणिकदृष्ट्या नेटवर्क अनिवार्य असते. मात्र, अशावेळी नेटवर्कच मिळत नसल्याने मोठी अडचण निर्माण होते. यासाठी बीएसएनएलने तातडीने या गावात मोबाईल नेववर्क सुरू करण्यासाठीचा प्रयत्न करण्याची मागणी होत आहे. वागदे सरपंच संदीप सावंत यांनीही आपण बीएसएनएलकडे मागणी करीत असल्याचे सांगितले. मात्र, बीएसएनएलला अपेक्षित जागा मिळत नसल्याने टॉवर होत नसल्याचे समजते. तरीही पर्यायी जागा शोधून टॉवर सुरू व्हावा, अशी मागणी होत आहे.

वागदे येथे वर्षभरापासून नेटवर्क समस्या, नागरिक हैराण
