फ्लाय९१ चा भारतीय लष्कराच्या शौर्याला सलाम
निलेश जोशी | सिंधुदुर्ग : भारतीय लष्कराच्या शौर्याला मानवंदना म्हणून फ्लाय९१ या प्रादेशिक विमानसेवेने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. भारतीय लष्करातील जवान तसेच त्यांचे जवळचे कुटुंबीय यांना फ्लाय९१च्या तिकिटांच्या मूळ दरावर ५०% सवलत दिली जाणार आहे. देशसेवेत मोलाचे योगदान देणाऱ्या या वीर जवानांच्या सन्मानार्थ ही सवलत जाहीर करण्यात आली असून, विशेष आसन राखीव ठेवणे व अतिरिक्त सामान वाहतूक सवलतही देण्यात येणार असल्याची माहिती फ्लाय९१ ने दिली आहे.
ही सवलत फ्लाय९१च्या सर्व उड्डाणांसाठी लागू असून, 'पहिले येणाऱ्यास प्राधान्य' या तत्त्वावर उपलब्ध आहे. प्रवासादरम्यान, लष्करी कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय प्रत्येकी ५ किलो अतिरिक्त चेक-इन सामानाची सवलतही दिली जाईल फ्लाय९१ कडून ही योजना भारतीय लष्कराच्या शौर्य, निस्वार्थ सेवा आणि कर्तव्यभावनेला वाहिलेली एक कृतज्ञतेची मानवंदना आहे.
राष्ट्रसेवेच्या कार्यात मदत करण्यासाठी फ्लाय९१ नेहमीच कटिबद्ध आहे. संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने लष्करातील जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ही सवलत देताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो,” असे फ्लाय९१ चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चाको यांनी सांगितले. एक जबाबदार भारतीय प्रादेशिक विमान सेवा म्हणून, देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या शूर जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आमचे आद्य कर्तव्य मानतो. दिली जाणारी ही सवलत आमच्या कृतज्ञतेचे मनःपूर्वक आणि नम्रतेने अर्पण केलेले एक छोटेसे प्रतीक आहे.” ते पुढे म्हणाले.
ही सुविधा घेण्यासाठी पात्र जवानांनी कृपया support@fly91.in या ई-मेलवर संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
फ्लाय९१ भारतातील टियर २ आणि टियर ३ शहरांना हवाई मार्गाने जोडण्यावर लक्ष केंद्रित करत असून देशातील शेवटच्या टप्प्यापर्यंत हवाई सेवा पुरवण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या फ्लाय९१ गोवा, हैदराबाद, पुणे, जळगाव, सिंधुदुर्ग आणि लक्षद्वीपमधील अगत्ती या ठिकाणी सेवा पुरवते.

