मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून जलवाहतूक सेवा सुरू होणार
साडेचार तासांत मालवण, तीन तासांत रत्नागिरीला पोहोचणार
मुंबई : कोकणचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या गणेशोत्सव साठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी खुशखबर आहे. कारण गणेशउत्सावासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास आणखी सुकर होणार आहे. चाकरमान्यांना कमी वेळेत आपल्या गावी पोहोचवण्यासाठी मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेत गणपतीत समुद्रमार्गे प्रवास उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे आता मुंबईतून साडेचार तासांत मालवण, विजयदुर्ग तर तीन तासांत रत्नागिरी गाठता येणार आहे.
मुंबईतील माझगावपासून मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू होणार, अशी मोठी घोषणा मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. हायटेक यंत्रणा असलेल्या एम टू एम या बोटीमार्फत आता कोकणात प्रवास करता येणार असल्याचे ही आता पुढे आले आहे. त्यामुळे चाकरमन्यांसाठी ही आनंदाची बातमी असून दरवर्षी होणाऱ्या प्रवासासंदर्भातील त्रासापासून काही अंशी सुटका होणार आहे.
२५ मे पासून एम टू एम बोट मुंबईत
गणेशोत्सवात कोकणात जाताना चाकरमान्यांना अधिक दिलासा देताना प्रवासाचा नवा पर्याय देण्यासाठी मत्स्य व बंदरे विभागाकडून मुंबईतील माझगावपासून मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू करण्यात येणार आहे. याकरिता एम टू एम बोट वापरली जाणार असून, येत्या २५ मे रोजी ती मुंबईतील भाऊचा धक्का येथे दाखल होणार आहे. मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून परवडणाऱ्या दरात जलवाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध करून दिला जात आहे.

