बसच्या दर्शनी भागाचा चक्काचूर
सुदैवाने चालक व प्रवासी बचावले : काहींना किरकोळ दुखापत
चौके : कुडाळ येथून मालवणच्या दिशेने येणारी एसटी बस आणि चौके वरून धामापूरच्या दिशेने जाणाऱ्या डंपर यांच्यात चौके नारायण वाडी या ठिकाणी मंगळवारी दुपारी अपघात झाला. या अपघातात एसटी बसचा दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे. यात चालक व प्रवासी सुदैवाने बचावले.मालवण डेपोची एसटी बस (M H -14 BT -3063) मंगळवारी दुपारी कुडाळ वरून मालवणच्या दिशेला येत असताना चौके नारायण वाडी येथे एसटी बस आणि चौके वरून धमापुरच्या दिशेने जाणाऱ्या डंपर(MH-07- AJ -2810) यांच्यामध्ये जोरदार धडक होऊन अपघात झाला. या अपघातात एसटी बसचा चालक किरकोळ जखमी होऊन सुदैवाने बचावला. बसमधील प्रवाशांनाही किरकोळ दुखापती झाल्या.

अपघातात एसटी बसचे मोठे नुकसान झाले. चालक वाहक आणि किरकोळ जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. बसचालक आणि वाहक यांनी अपघाताची खबर मालवण एसटी आगारात दिली असून एसटी प्रशासनाकडून पुढील कार्यवाही सुरु होती.

