मसुरेतील मसूरकर जुवाबेट धुपप्रतिबंधक बंधारा कामाचाही शुभारंभ
जनतेच्या सुरक्षिततेसाठी व सांस्कृतिक परंपरेच्या जपणुकीसाठी नेहमी कटिबद्ध!
मालवण : मसुरकर जुवा बेटाच्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्यासाठी 3 कोटी 48 लाख रुपये निधीची तरतूद मी आमदार झाल्यानंतर झाली. मागील दहा वर्ष विरोधकांनी काहीही केले नाही. फक्त राणे कुटुंबावर टिका हेच त्यांचे काम. मात्र आमची बांधिलकी जनतेशी आहे, विकास कामांची आहे. म्हणूनच महायुती सरकारच्या माध्यमातून केवळ पाच महिन्यात पाचशे कोटींची कामे प्रगती पथावर आहेत. गतिमान विकास असाच सुरु राहील. असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी मसूरे येथील मसूरकर जुवा बेट येथे केले.
मालवण तालुक्यातील मसुरकर जुवा बेट येथील श्रीदेवी भवानी आई, श्री देव मूळ पुरुष आणि श्री देव होळ देव या देवस्थानाच्या व ग्रामस्थांच्या संरक्षणार्थ ₹ ३ कोटी ४८ लाख निधी मंजूर करून धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाचे भूमिपूजन कुडाळ मालवणचे आमदार माननीय निलेशजी राणे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आई भवानी मातेच्या त्रैवार्षिक गोंधळ उत्सवात देवीचे दर्शन घेतले.
कालावल खाडीपात्रातील मसुरकर जुवा बेट येथील 3 कोटी 48 लाख रुपये निधी मंजूर असलेल्या धूप प्रतिबंधक बंधारा कामाचे भूमिपूजन आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, मसूरे देवस्थान प्रमुख बाबुराव प्रभूगावकर, पतन विभागअभियंता श्री समाधान जाधव, सौ. सरोज परब, दीपक पाटकर महेश बागवे, राजेंद्र प्रभुदेसाई, संतोष साटवीलकर, दादा साईल, सौ. लक्ष्मी पेडणेकर, छोटू ठाकूर, शिवाजी परब, बाबू परब, मंदार लुडबे, दया देसाई, विश्वास मसुरकर, सुरेश मसूरकर, जितेंद्र परब, बाबू आंगणे, तात्या हिंदळेकर, मसूरकर कुटुंबीय आदी मसूरे कावा ग्रामस्थ उपस्थित होते. मसूरकर कुटुंबियांच्या वतीने आमदार निलेश राणे आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले, गावातील डांगमोडे रस्ता दर्जेदार बनणार आहे. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत संघटना एका बाजूने भक्कमपणे सांभाळत आहेत. त्यामुळे मला सभागृहात तयारीने जाता येत आहे. कोकणातील अनेक लहान मोठया विषयाना चालना देण्याचा माझा प्रयत्न आहे. आरोग्य, रस्ता, शिक्षण, शेती असे अनेक विषय सभागृहात येत आहेत. विकासकामे पुर्ण करण्याबाबत दत्ता सामंत यांनी दिलेला शब्द म्हणजे माझा शब्द आहे. आपण विकास कामांची मागणी दत्ता सामंत यांच्या जवळ करावी ती पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असेल. येणाऱ्या निवडणूकित जि. प. सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच सुद्धा आपलाच महायुतीचा यायला हवा. असे ते म्हणाले. यावेळी विविध विकास कामांची निवेदने ग्रामस्थ यांच्या वतीने देण्यात आली.
विकासाचा बॅकलॉग भरून काढला जातोय! जिल्हाप्रमुख दत्ता सामंत
यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत म्हणाले, निलेशजींनी हा बंधारा प्रश्न मार्गी लागेल असे आश्वासन काही महिन्यांपूर्वी दिले व आमदार म्हणून निवडून आल्यावर या कामास तात्काळ निधी मंजूर करून घेऊन चालना दिली. उबाठा माजी आमदाराला त्यांचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री होते तरी निधी आणणे शक्य झाले नाही हे दुर्दैव आहे.
मात्र आम्ही विकास हेच धोरण ठेवले आहे. विकासाबरोबरच या भागात रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न राहणार आहेत. येणाऱ्या सर्व निवडणुकीत आमदार निलेश राणे यांच्या विचाराचा उमेदवार निवडून द्या. पुढील पंचवीस वर्षे तुमचे प्रेम निलेश साहेबांच्या मागे असेच ठेवा असे आवाहन दत्ता सामंत यांनी यावेळी केले.
माजी जि. प. अध्यक्ष सौ. सरोज परब यांनी मार्गदर्शन करताना आमदार निलेश राणे यांनी वचनपूर्ती केली आहे त्याबद्दल आभार मानले. विकासनिधी आणण्याचे काम फक्त राणे कुटुंब करू शकते. विकासात काहीही कमी राहणार नाही असे आश्वासित केले. सूत्रसंचलन पंढरीनाथ मसूरकर यांनी केले.

