गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांचे प्रतिपादन
मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी पदभार स्वीकारला
मालवण | प्रतिनिधी : माझ्याच मालवण तालुक्यात गटविकास अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. सर्व अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांच्या साथीने मालवण पंचायत समिती आदर्शवत कामगिरीसह अग्रेसर ठेवण्यासाठी माझे प्रामाणिक योगदान राहील. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या सहकार्यातून जास्तीत जास्त विकासकामे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गावागावात पुर्णत्वास नेण्याचे प्रयत्न राहतील. असे प्रतिपादन मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी केले.
माझ्या आयुष्याची अनेक वर्षे मी मालवणमध्ये सेवेत पुर्ण झाली आहेत. प्रशासकीय कामकाज करताना अनेकदा सर्वसामान्यांमध्ये मिसळून काम केले आहे. कुडाळ याठिकाणी काम करत असतानाही अनेक विकासकामे पूर्ण करण्यासाठी आणि शासनाने निश्चीत करून दिलेली कामे पूर्ण करण्यासाठी माझा प्रयत्न राहिलेला आहे. ज्या नांदोस गावात माझा जन्म झाला त्या तालुक्यात काम करण्याची संधी मिळाल्याने माझ्याकडे असलेला कालावधी चांगल्याप्रकारे जनतेच्या सेवेत अर्पण करण्यासाठी आपण कार्यरत राहणार आहे, असेही गटविकास अधिकारी शाम चव्हाण म्हणाले.
मालवण गटविकास अधिकारी म्हणून श्याम चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी बुधवारी पदाभार स्विकारल्यानंतर त्यांचे पत्रकार, कर्मचारी व अधिकारी वर्गातर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी सहाय्यक गटविकस अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, मालवण पत्रकार समितीचे अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, सचिव कृष्णा ढोलम, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अमीत खोत, मनोज चव्हाण, महेश कदम, आप्पा मालंडकर तसेच इतर उपस्थित होते.
शाम चव्हाण म्हणाले, मी मालवण तालुक्यातील ग्रामस्थांसाठी कायम भेटण्यासाठी वेळ निश्चीत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तालुक्यातून अनेक किलोमीटरवरून येणाऱ्या ग्रामस्थांना गटविकास अधिकारी कार्यालयात उपलब्ध होणे आवश्यक आहे, यासाठी आपण खास नियोजन करणार आहे. मी उपस्थित नसेन त्यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी जनतेच्या सेवेत उपलब्ध असतील. अशाप्रकारचे नियोजन करण्यात येणार आहे. माझी केबिन सर्वसामान्यांसाठी सदैव खुली राहणार आहे, मी सर्वसामान्य कुटुंबातील असून मला मालवण तालुक्यासाठी जेवढे जास्त करता आले तर मी भाग्यवान समजेन. बरोबर एका वर्षानंतर याच ठिकाणाहून सेवानिवृत्त होणार आहे, असेही श्री. चव्हाण म्हणाले.
आमदारांचे बहुमोल सहकार्य
मालवण पंचायत समिती स्थानिक अधिकारी येण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी महत्वपूर्ण भुमीका बजावली आहे, यामुळे आपण त्यांचे आभारी आहोत. त्यांनी मला याठिकाणी काम करण्यासाठी संधी दिलेली आहे. मालवण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना उपलब्ध होणाऱ्या निधीतून मंजूर असणारी कामे आणि भविष्यात मंजूर होणारी कामे पूर्ण करून घेण्यासाठी आपला पाठपुरावा राहणार आहे. सामाजिक कार्यकर्ते दत्ता सामंत, गोट्या सावंत यांनीही अनेकदा आपल्याला सहकार्य केले आहे. मालवण तालुका जिल्ह्यात एक नंबरवर नेण्यासाठी सर्वांचेच सहकार्य घेण्यात येणार आहे. माझे कर्मचारी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि सर्वच प्रशासकीय विभागांचे अधिकारी यांच्या सहकार्यातुन काम करणार आहे, असेही श्री. चव्हाण यांनी सांगितले.

