श्री मार्गेश्वर क्रीडा मंडळ, हडी यांच्या वतीने आयोजन
दिपिका देऊलकर | मालवण : मालवण तालुक्यातील हडी येथे प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी मार्गेश्वर क्रीडा मंडळ, हडी यांच्या वतीने गुरुवार दि. १ मे रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार ३० एप्रिल सकाळी ९ वाजता मार्गेश्वर क्रीडा मंडळ हडी आणि सिंधू रक्तमित्र आयोजित व कै. राजू रावले यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता लहान मुलांकरिता चित्रकला स्पर्धा होणार आहे. सायं. ५ वाजता श्री देव मार्गेश्वर उत्सव मुखवटा दिंडी निघणार आहे.
गुरुवार दि. १ मे रोजी सकाळी ९:३० वाजता सत्यनारायण महापूजेला प्रारंभ होणार आहे. दुपारी १२ वाजता महाआरती, तीर्थप्रसाद झाल्यानंतर महाप्रसाद होणार आहे. यावेळी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायं. ७ वाजता स्थानिक मंडळांची सुस्वर भजने झाल्यावर रात्रौ ठीक ९:३० वाजता साई आराधना संगीत मुंबई, निलेश कावले व शशांक कावले प्रस्तुत मराठी, हिंदी भक्ती गीत, भावगीतांचा नजराणा श्री मार्गेश्वर चरणी सादर होणार आहे.
शुक्रवार दि. २ मे रोजी सायं. ५ वाजता महिला व मुलांसाठी सांस्कृतिक खेळ होणार आहेत. रात्रौ ८:३० वाजता स्वागत समारंभ व बक्षीस वितरण समारंभ झाल्यानंतर रात्रौ ठीक १० वाजता लेखक यशवंत मानके लिखित व संतोष सावंत दिग्दर्शित कौटुंबिक जिव्हाळ्याचे हृदयस्पर्शी रहस्यमयी दोन अंकी नाट्यपुष्प दोष कुणाचा सादर होणार आहे.
तरी जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री मार्गेश्वर क्रीडा मंडळ हडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.


