शिवभक्तांच्या उपस्थितीत साजरा होणार सोहळा
मालवण: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अभिमानाचे आणि शिवभक्तांच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या शिवलंका किल्ले सिंधुदुर्ग येथील जगातील पहिल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या श्री शिवराजेश्वर मंदिरात वैशाख शुद्ध द्वितीया शके १९४७ मंगळवार २९ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पारंपारिक जन्मोत्सव साजरा होणार आहे.
शिवलंका किल्ले सिंधुदुर्गवर १६९५ पासून छत्रपती राजाराम महाराज यांनी शिवजन्मोत्सव सोहळा सुरू केला होता. याला आता ३२९ वर्ष पूर्ण झाली असून या वर्षी मंगळवार २९ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३३० वा पारंपारीक जन्मोत्सव साजरा होणार आहे. शिवराजेश्वर मंदिरात हा जन्मोत्सव सकाळी १०:३० ते १ या वेळात ढोल पथकांच्या गजरात शिवभक्तांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे घोष मानवंदना होणार आहे.
या उत्सवास जिल्ह्यासह राज्यातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक डॉ. अरविंद कुडतरकर हेही उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून अभयराजे जगताप, पुणे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. जन्मोत्सवासाठी जिल्ह्यातील जनतेने महाराजांना मानवंदना देण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


