माजी विद्यार्थी मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध स्पर्धांचे आयोजन
मालवण | प्रतिनिधी : मालवण येथील भंडारी एज्युकेश सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयाला यावर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. विविध स्पर्धा व कार्यक्रमांनी हा सुवर्णमहोत्सव साजरा होत आहे. ४ मे रोजी सुवर्णमहोत्सवाचा मुख्य कार्यक्रम म्हणजेच माजी विद्यार्थी मेळावा व माजी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. अशी माहिती भंडारी एज्युकेशन सोसायटी, भंडारी कनिष्ठ महाविद्यालय व माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आली.
मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेस भंडारी एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत, लोकल कमिटी खजिनदार जॉन नरोना, लोकल कमिटी सदस्य दशरथ कवटकर, मुख्याध्यापक हणमंत तिवले, प्रा. पवन बांदेकर, प्रा. गुरूदास दळवी, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भूपेश गोसावी, माजी विद्यार्थी भूषण मेतर, अनिकेत फाटक, सौ. प्रविणा शिंदे, ललित चव्हाण, सिद्धेश चव्हाण, प्रा. अवसरे, नंदकिशोर मळेकर आदी व इतर उपस्थित होते.यावेळी प्रा. पवन बांदेकर यांनी सुवर्णमहोत्सव कार्यक्रमांची रूपरेषा स्पष्ट केली. सुवर्णमहोत्सव वर्षानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, माजी विद्यार्थिनींसाठी पाककला स्पर्धा घेण्यात आली. तसेच रील्स स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तसेच रविवार दि. २७ एप्रिल रोजी भव्य प्रो- कबड्डी स्पर्धा महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाल्या. अनेक संघ यामध्ये सहभागी झाले . दि. ३ मे रोजी सकाळी हायस्कुल व महाविद्यालयात श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे. तर त्याचदिवशी सायंकाळी ४ वाजता माजी विद्यार्थिनींसाठी होममिनिस्टर - पैठणी स्पर्धा आयोजित केली आहे.
सुवर्णमहोत्सवाचा मुख्य कार्यक्रम ४ मे रोजी मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे होणार असून सकाळच्या सत्रात माजी विद्यार्थी मेळावा होणार आहे. या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. मनिष दळवी, अध्यक्ष म्हणून भंडारी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विजय पाटकर, तसेच मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात भंडारी एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळा, हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक, राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेले माजी विद्यार्थी, गुणवंत आजी विद्यार्थी, महोत्सवासाठी २५ हजार रुपये व त्यापेक्षा जास्त देणगी देणारे दाते यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच चित्रकला, पाककला व रील्स स्पर्धेतील विजेत्यांचा गुणगौरव करण्यात येईल.
दुसऱ्या सत्रात दुपारी ३ वाजल्यापासून माजी व आजी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत, अशी माहिती प्रा. बांदेकर यांनी दिली. तसेच या सुवर्णमहोत्सवाचा सांगता समारोप जुलै महिन्यात होणार असून त्यानिमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येईल, तसेच सुवर्णमहोत्सव स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येईल, असेही प्रा. बांदेकर यांनी सांगितले.यावेळी दशरथ कवटकर म्हणाले, भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव हा माजी विद्यार्थी एकत्र येऊन साजरा करत आहेत, संस्थेचे देखील सहकार्य आहे, सर्व माजी विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी होऊन आनंद घ्यावा असे सांगितले. तर वामन खोत यांनी सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांना एकत्र येण्याची संधी असून माजी विद्यार्थी व यां शिक्षण संस्थेचे ऋणानुबंध अधिक घट्ट होतील असे सांगितले. जॉन नरोना यांनी भंडारी हायस्कुलच्या शतकमहोत्सवा नंतर प्रथमच मोठा कार्यक्रम या प्रशालेत होत असल्याने प्राथमिक, हायस्कुल व महाविद्यालय अशा सर्व माजी विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे असे सांगितले. प्रविणा शिंदे यांनी जुन्या बॅचच्या विद्यार्थ्यांना या महोत्सवात सहभागी करून घेण्यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे सांगितले. तर अनिकेत फाटक यांनी अनेक माजी विद्यार्थी या महोत्सवासाठी मेहनत घेत असल्याचे सांगत जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन केले.

