कुडाळ पोलिसांची कारवाई सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्हातूनही हद्दपार
निलेश जोशी | कुडाळ : कुडाळ पोलिसांच्या हद्दीत राहणारा सराईत गुन्हेगार नदीम अब्दुल रहमान शेख रा. पिंगुळी यास दोन वर्षाकरीता सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे. त्याला आज कोल्हापूर जिल्ह्यात पाठवण्यात आले. अशी माहिती कुडाळ पोलीस ठाण्यातुन प्रसिद्धी पत्रकातर्फे देण्यात आली.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, नागरिकांचे जीविताचे व मालमत्तेचे रक्षण करणे हे पोलिसांचे आद्य कर्तव्य आहे. काही समाजकंटक सराईत गुन्हेगार यांचे पासून नागरिकांचे जीविताचे व मालमत्तेचे रक्षण व्हावे याकरिता त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल, अपर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रमुख यांना आदेशित केले होते.
कुडाळ पोलिसांच्या हद्दीत राहणारा सराईत गुन्हेगार नदीम अब्दुल रहमान शेख रा. पिंगुळी याचे वर चोरी, घरफोडी, दुखापत, खुनाचा प्रयत्न यासारखे ८ गंभीर गुन्हे दाखल होते. त्याच्या वागण्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नव्हती. सदर सराईत गुन्हेगारापासून भविष्यात गंभीर गुन्हे घडू नये याकरिता त्यास पायबंद घालणे जरुरीचे होते. याकरिता कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सदर इसमास महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे दोन वर्षाकरिता सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यातून हद्दपार करणे बाबतचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी, कुडाळ यांच्याकडे पाठविण्यात आलेला होता. पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी पाठवलेले हद्दपार प्रस्तावाची सुनावणी उपविभागीय दंडाधिकारी, कुडाळ यांचेकडे होऊन त्यांनी नमूद सराईत गुन्हेगारास सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार करणे बाबतचा आदेश पारित केला. त्याप्रमाणे सदर आदेशाची अंमलबजावणी करून सदर गुन्हेगारास रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार करुन त्याला कोल्हापुर जिल्ह्यात आज दि. २७ एप्रिल २०२५ रोजी पाठविण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग सौरभ कुमार अगरवाल, अपर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग ऋषिकेश रावले, उपविभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुडाळ राजेंद्र मगदूम, पोलिस अंमलदार कृष्णा केसरकर, प्रीतम कदम, कृष्णा परूळेकर, संजय कदम, रुपेश सारंग, उषा आहेर यांनी केली आहे.
कुडाळ पोलीस ठाणे अभिलेखावर ज्या इसमांवर शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध बाबतचे गुन्हे दाखल आहेत व त्यांच्या वागण्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नाही अशा गुन्हेगारांचे अभिलेखाचे पडताळणी करून नमूद इसमांवर अशाप्रकारे कारवाई करण्याचे सातत्य ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती कुडाळ पोलीस ठाण्यातून प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली.

