निलेश जोशी | कुडाळ : तालुक्यातील पिंगुळी उत्कर्षनगर येथील सेवानिवृत्त निवासी उपजिल्हाधिकारी तथा महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन पुणेचे माजी कोकण विभागीय उपाध्यक्ष मनोहर आंबेकर (वय ७९ )यांचे गुरुवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
मनोहर आंबेकर हे सेवानिवृत्त झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नासाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला. विविध मेळावे घेऊन शेवटच्या श्वासापर्यंत ते कार्यरत राहिले. दरम्यान गुरुवारी रात्री ते महाराष्ट्र पेन्शन असोसिएशनच्या बैठकीसाठी पुणे येथे जात होते. कुडाळ एसटी स्टँड येथे त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच ठिकाणी त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवराबरोबरच ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे पदाधिकारी जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनोहर आंबेकर जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, कुडाळचे कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन पुणेचे माजी कोकण विभागीय उपाध्यक्ष , ज्येष्ठ नागरिक सहकारी पतसंस्था,मानद सचिव , जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन कुडाळचे विद्यमान अध्यक्ष होते.मूळ दापोलीचे असून गेली बरीच वर्षे कुडाळ पिंगुळी येथे स्थायिक झाले होते. अपर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण प्रशासक, नगर परिषद, मालवण, अपर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण, कुडाळ विशेष भूसंपादन अधिकारी रत्नागिरी, निवासी उपजिल्हाधिकारी ,सिंधुदुर्ग या पदावर त्यांनी काम केले. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचे विविध प्रश्न मार्गी लावण्याचे दृष्टिकोनातून काम केले होते. अलीकडेच झालेल्या ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या सभेत त्यांनी विविध प्रश्नासाठी वेळप्रसंगी आंदोलन उभारण्याचा इशारा दिला होता. त्यांच्या मागे मुलगे, मुलगी, सुना ,नातवंडे असा परिवार आहे येथील वीज वितरण कंपनीचे कर्मचारी निलेश आंबेकर यांचे ते वडील होत

