हल्ल्यात बळी गेलेल्या निर्दोष नागरिकांबद्दल मुस्लीम समाजातर्फे शोक व्यक्त
मालवण : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या क्रूर आणि अमानुष हल्ल्यात निरपराध पर्यटक आणि स्थानिक नागरिकांचा बळी गेला, याबद्दल तीव्र निषेध व्यक्त करत आहोत.
अशा हिंसक आणि मानवी मूल्यांना काळिमा फासणाऱ्या कृत्यांचे कोणत्याही प्रकारे समर्थन होऊ शकत नाही. आमचा मुस्लिम समाज नेहमीच शांतता, सद्भाव आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या बाजूने उभा राहिला आहे व यापुढेही राहील.
दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या निर्दोष नागरिकां बद्दल आमच्या मुस्लीम समाजातर्फे तीव्र शोक व्यक्त करत आहोत. या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. अश्या भावना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मुस्लीम समाजातर्फे मालवण तहसीलदार यांना निवेदन देत व्यक्त करण्यात आल्या.
हा हल्ला अत्यंत भ्याड, अमानवी आणि देशाच्या शांततेस बाधा आणणारा आहे. भारताचे नागरिक म्हणून आम्ही सर्वधर्मीय लोक एकत्र आहोत आणि अशा हिंसक कृत्य करणा-याना कठोर शासन व्हायला हवे. प्रशासनाच्या व सरकारच्या योग्य ती कारवाई करण्याच्या निर्णयास आमचा पूर्ण पाठिंबा दर्शवितो. आम्ही भारतीय मुस्लीम समाज या देशाच्या एकतेच्या बाजूने उभा आहे. अशा घटनांचा तीव्र निषेध करतो. तसेच, आम्ही तहसीलदार यांच्यामार्फत राज्य व केंद्र शासनापाशी मागणी करतो की अशा घटनांना आळा घालण्यासाठी कडक पावले उचलावीत व दोषींवर कठोर कारवाई करावी.
भावपूर्ण श्रद्धांजली व एकतेचा संदेश देत असल्याच्या भावना मुस्लिम समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या.

