वेंगुर्ला : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक व राज्यसभा खासदार शरद पवार २४ एप्रिल रोजी खासगी दौऱ्यावर वेंगुर्ल्यात येणार आहेत. या एक दिवशीय दौऱ्यात ते वेंगुर्ल्यातील बॅ. नाथ पै स्मृती व समुदाय केंद्र येथे भेट देणार असून केंद्राची विकास प्रक्रिया आणि तेथे चालणाऱ्या उपक्रमांची माहिती घेणार आहेत. या दौऱ्याचे आयोजन व्हिक्टर डॉन्टस यांच्या आतिथ्याखाली करण्यात आले आहे.
श्री. पवार यांनी यापूर्वी ऑक्टोबर २०२२ मध्ये नाथ पै यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने या स्थळाला भेट दिली होती. त्यावेळी या केंद्राच्या आराखड्याबद्दल त्यांना माहिती देण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी नाथ पै यांच्यासारख्या थोर व्यक्तीच्या स्मृतीसाठी भव्य स्मारक उभारण्यास आपला पाठिंबा राहील, असे आवर्जून सांगितले होते. केंद्राच्या औपचारिक उद्घाटननंतर सहा महिन्यांनी श्री. पवार पुन्हा एकदा येथे भेट देत आहेत. बॅरिस्टर नाथ पै फाऊंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट या संस्थेच्या विविध उपक्रमांबाबत व इतर संस्था, संघटनांसोबतच्या सहकार्याने राबविल्या जाणाऱ्या प्रकल्पांची माहिती घेणार आहेत.

