सावंतवाडी : सावंतवाडी येथील १७३ वर्षापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या श्रीराम वाचन मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व औचित्यपूर्ण स्वरूपात पार पडला. वर्धापन दिनाचे औचित्य साधून स्व. ॲड. दीपक नेवगी यांच्या स्मृती जतन करण्यासाठी संस्थेमध्ये त्यांचा स्मृती दिन साजरा करण्यात आला.
स्व. ॲड. दीपक नेवगी हे बहुआयामी व्यक्तीमत्व होते. याचेच एक अंग म्हणजेच ते एक उत्तम किर्तनकार होते. हे औचित्य साधुन या प्रसंगी स्व. ॲड. दिपक नेवगी यांच्या स्मरण प्रित्यर्थ कोकळाचे जेष्ठ सुपुत्र व किर्तनकार विश्वनाथ मंगेश उर्फ भाऊ नाईक यांना ॲड. दीपक नेवगी' पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विशेष कार्यकारी मा. शहाजान शेख यांनी भुषविले. त्यानंतर भाऊ नाईक यांनी कोकण भुमीतील संत भालचंद्र महाराज यांच्या जीवनपटावर आधारित सुश्राव्य किर्तन सादर केले. यावेळी त्यांना तबल्याची साथ बंड्या धारगळकर व गणेश वेतोरकर व पेटीची साथ शहाजान ए. शेख यांनी केली. दोन तासाहून अधिक उत्तम प्रकारे सुरू असलेल्या या सोहळ्यात श्रोतेवर्ग मंत्रमुध्द झाला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुमेधा धुरी, प्रास्ताविक डॉ. जी. ए. बुवा यांनी, मान्यवरांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष प्रसाद पावसकर यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेचे कार्यवाह रमेश बोंद्रे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथपाल महेंद्र पटेल यांनी केले. प्रस्तुत कार्यक्रमास श्रोतेवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

