मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांच्याकडे रविकिरण तोरसकर यांची मागणी
मालवण : पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत सागर मित्रांची नियुक्ती करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन भाजप मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे. पंतप्रधान मत्स्यसंपदा योजने अंतर्गत सन फेब्रुवारी २०२१ ते सन ३१ मार्च २०२५ या कालावधी दरम्यान पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना, केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राबविली जात आहे.
मत्स्यसंपदा योजना सर्वसामान्य मच्छिमार, मत्स्यव्यवसायिक, मत्स्यशेतकरी यांच्यापर्यंत पोहोचवणे व त्यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे, तांत्रिक कामकाज यासाठी सागरमित्र म्हणून पद नियुक्ती करण्यात आली होती. नियुक्त सागरमित्रांमुळे पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेची प्रभावी अंमलबजावणी शक्य झाली. हि नियुक्ती अकरा महिने कंत्राटी पदरी कालावधीसाठी आहे. सद्यस्थितीत कार्यान्वित असणाऱ्या सागरमित्र यांचा कालावधी ३१ मार्च २०२५ रोजी संपला आहे. त्यामुळे पंतप्रधान मत्स्य संपदा योजने अंतर्गत सागरमित्र नियुक्ती तात्काळ व्हावी. तसेच मागील कालावधीत कार्यरत असलेल्या सागरमित्र यांना प्राधान्य मिळावे अशी मागणीही श्री. तोरसकर यांनी केली आहे.

