कुडाळ काळपनाका ओव्हरब्रिजवर झाला अपघात
निलेश जोशी | कुडाळ : मुंबई- गोवा महामार्गावर कुडाळ काळपनाका येथील ओव्हरब्रिजवर आज, बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास दुचाकी आणि रोडरोलर यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार रवींद्र भास्कर बागकर (वय ६५ वर्षे, रा. नेरूरपार बांधीवडेकर टेम्ब, ता. कुडाळ) हे गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी अधिक उपचारासाठी जखमी दुचाकीस्वार याला गोवा- बांबुळी येथे नेण्यात आले आहे. दरम्यान, श्री. बागकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळ आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेरूरपार, बांधीवडेकर टेम्ब, तालुका कुडाळ येथील रहिवाशी रवींद्र बागकर (वय ६५) हे सेवानिवृत जिल्हा बँक कर्मचारी आहेत. आज सकाळी ते ओरोस येथे जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयात आपल्या एक्सेस दुचाकीवरून (MH-07-AR-0513) निघाले असता कुडाळ ओव्हर ब्रीजवर त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटून ती पुढे जात असलेल्या रोड रोलरवर आदळली. यात रविंद्र बागकर यांच्या पायाला आणि छातीला गंभीर दुखापत झाली. यावेळी त्यांना तत्काळ ओरोस जिल्हा रुग्णालयात त्यांना रुग्णवाहिकेद्वारे नेण्यात आले. मात्र, बागकर गंभीर जखमी होते. त्यांना श्वसनांचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना तत्काळ गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले.
या प्रकरणी दुचाकी चालक रवींद्र बागकर यांच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात BNS कलम 125 (a), 125 (b), 281, मोटार वाहन अधिनियम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सुबोध माळगावकर यांनी दिली. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. शिंगाडे करीत आहेत.

