कुडाळ मध्ये आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव अभियान अंतर्गत प्रशिक्षण
सरपंच आणि ग्रामसेवक सहभागी
निलेश जोशी | कुडाळ : शासना मार्फत आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक गावचे सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनी गावे सुंदर बनविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन कुडाळचे गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक यांनी केले. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती कुडाळ अंतर्गत आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव अभियान योजनेंतर्गत तालुक्यातील सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांची एकदिवसीय कार्यशाळा शुक्रवारी कुडाळ येथील महालक्ष्मी हाॅलच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष राजन परब यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी व्ही.एम.नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी शाम चव्हाण, मुख्य मार्गदर्शक रामचंद्र पाटील (गारगोटी), विस्तार अधिकारी (ग्रा.पं.) आनंद कुंभार व संजय ओरोसकर, रांगणातुळसुली स्मार्ट ग्रामपंचायतीचे उपसरपंच नागेश आईर, नेरूर सरपंच सौ.भक्ती घाडी उपस्थित होते. या कार्यशाळेला तालुक्यातील सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.
व्ही.एम.नाईक म्हणाले, तालुक्यातील सर्वच सरपंच गावांचा कारभार चांगल्या प्रकारे चालवत आहेत. ग्रामपंचायत अधिका-यांची त्यांना चांगली साथ मिळत आहे. शासना मार्फत आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक गावचे सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनी गावे सुंदर बनविण्यासाठी पुढाकार घेऊन या अभियानात सहभागी व्हावे. आज या ठिकाणी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, शासन परिपत्रके, अध्यादेश, शासन निर्णय, लेखा संहिता, हस्तांतरण नोंदी, निविदा प्रक्रिया यांसह सर्वच विषयांबाबत हि प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या प्रशिक्षणातील माहितीचा बारकाईने अभ्यास करावा असे आवाहन त्यांनी केले.
राजन परब म्हणाले, आजचे हे प्रशिक्षण सर्वांनी आत्मसात करावे. नवनवीन माहितीचे अवलोकन करावे. याचा निश्चित फायदा तुम्हा आम्हा सर्वांनाच होणार आहे. श्री. चव्हाण म्हणाले, जिल्ह्यात कुडाळ पंचायत समिती सर्वच योजनांच्या उद्दिष्टांमध्ये नेहमीच अव्वल असते. आताही सर्वच योजनांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया, असे आवाहन त्यांनी केले. स्मार्ट ग्रामपंचायतीचे उपसरपंच नागेश आईर यांनी मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षण कार्यशाळेला मुख्य मार्गदर्शक रामचंद्र पाटील (गारगोटी) यांनी उपस्थित सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांना विविध विषयांवर सखोलपणे मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन कक्ष समन्वयक सुनील प्रभू यांनी केले तर आभार विस्तार अधिकारी संजय ओरोसकर यांनी मानले.

