गुन्हा दाखल | न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून युवतींच्या अंगावर
खाजकुवलीची पूड टाकण्याचे प्रकार घडत होते. सोमवारी रात्री असाच एक प्रकार पुन्हा घडला. याप्रकरणी संशयित आरोपी विनायक ज्ञानेश्वर धुरी (रा. वायरी भुतनाथ) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सोमवारी रात्री एका घराची कौले काढून घरातील युवतीच्या अंगावर खाजकुवली टाकल्याचा प्रकार घडला. मुलीने तसेच घरातील सदस्यांनी आरडा ओरडा केला. अनेकजण जमा झाले. यावेळी एकजण अंधारातून पळून गेला. मात्र तेथे चप्प्पल तसेच रस्त्यावर मोटारसायकल दिसून आली. मोटारसायकल बाबत माहिती पोलिसांनी मिळवली. तसेच मिळालेल्या सर्व माहितीच्या आधारे याप्रकरणी संशयित आरोपी विनायक ज्ञानेश्वर धुरी (रा. वायरी भुतनाथ) याला मालवण पोलिसांनी ताब्यात घेतले. गुन्हा दाखल केला.
याबाबत तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी संबंधित युवती काम करतं असलेल्या लॅपटॉपवर खाजकुवली पडली असल्याचे तसेच घराच्या बाहेर एक चप्पल, एका कागदात खाजकुवली तसेच एक दुचाकी सापडून आली. पोलिसांनी या सर्व गोष्टी ताब्यात घेतल्या. तसेच धुरी याचा मोबाईल ही ताब्यात घेण्यात आला आहे. या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी जिल्हा पोलीस दलाचे फॉरेन्सिक पथक दाखल झाले होते. या पथकाने घटनास्थळी भेट देत पाहणी करुन आपला अहवाल दिला आहे. शहर परिसरात यापूर्वीही काही मुलींवर खाज कुवली टाकल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारीही दाखल झाल्या आहेत. मात्र यातील संशयितास पकडण्यात यश आले नव्हते. त्यामुळे या घटनांशी या संशयित आरोपीचा संबंध असावा असे बोलले जात आहे. या प्रकरणी कठोर कारवाई झाली पाहिजे. यात अन्य कोणी साथीदार असण्याची शक्यता आहे. त्यांचाही पोलिसांनी शोध घ्यावा. तुमच्यावरही कारवाई व्हावी. अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली जी. एल. शिंदे अधिक तपास करत आहेत.

विकृत तरुणाला पोलिसांनी पकडले
