प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात शाब्दिक चकमक ; अखेर….
मालवण : मालवण देऊळवाडा ग्रामपंचायतिचा कारभार मनमानी आहे. बेकायदेशीररित्या जामीन खरेदी केल्याच्या निषेधार्थ ढोल ताशा आंदोलन. असे बॅनर हाती घेऊन काही ग्रामस्थांनी मालवण पंचायत समितीसमोर ढोलताशा वाद्य आंदोलन केले. पंचायत समिती आवारात केलेल्या या आंदोलनामुळे प्रशासन त्याठिकाणी एकवटले. यावेळी प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.
दरम्यान, गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर म्हणाले,
ग्रामपंचायतने मासिक सभेत ठराव घेऊनच इमारतीसाठी देऊळवाडा मसुरे रस्त्यालगत १ लाख ६० हजारात नाममात्र दरात सुमारे चार गुंठे जागा खरेदी केली. ग्रामपंचायतला जमीन खरेदीचा अधिकार आहे. मासिक सभा घेऊन जागा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपल्या उत्पन्न वाढीसाठी ग्रामपंचायत निर्णय घेऊ शकते. जागा खरेदी झाल्यानंतर आता मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती ग्रामपंचायत बांधणी योजनेतर्गत इमारतीसाठी निधी मंजूर आहे. असे गटविकास आधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी सांगितले.
मालवण देऊळवाडा ग्रामपंचायतीने नविन इमारत बांधकामसाठी ग्रामनिधी फंडाचा गैरवापर केला असून त्यात गैरव्यवहार झाला आहे. त्याची चौकशी करावी अशी मागणी यापूर्वी केली होती. आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आला आहे असा आरोप करत
अमित तांबे व अन्य ग्रामस्थ यांनी सामाजिक कार्यकर्ते महेश जुवाटकर यांच्या सोबतीने मालवण पंचायत समिती समोर ढोल ताशा आंदोलन केले. आंदोलकांनी पंचायत समिती आवारात घुसण्याचा प्रयत्न केला असता प्रशासनाने आंदोलकांना रोखले. ढोल ताशा वाजविणे किंवा आंदोलनाची कोणती परवनागी घेतली असा सवाल पंचायत समिती अधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतने खरेदी केलेल्या जागेमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. त्यासाठी कोणतीही ग्रामसभा घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाल्याने आधिकारी आणि ग्रामस्थ आमने सामने आले. नवीन इमारत बांधकामास स्थगिती द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

