मालवण : महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या जन्मदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महास्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण व संवर्धन, विहिरी, नद्या साफसफाई, जल पुनर्भरण, पाणपोई, बंधारा उपक्रम, शैक्षणिक साहित्य वाटप व स्वच्छता अभियान असे अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. ही स्वच्छता मोहीम स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपालांनी नियुक्त केलेले स्वच्छता दूत डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून मालवण चिवला बीच संपूर्ण परिसर व त्या लगतच्या रस्त्यांची साफसफाई करण्यात आली. अंदाजे ६ टन ओला कचरा व २ टन सुका कचरा गोळा करून नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंड वर जमा करण्यात आला.
सदर स्वच्छता अभियानामध्ये मालवण बैठक, चिंदर बैठक व गावराई बैठक येथील 410 श्री सदस्य उपस्थित होते. त्याचप्रमाणे मालवण नगरपालिका प्रशासकीय अधिकारी संध्या गवळी, स्वच्छता अभियंता अमोल काटवळ, स्वच्छता निरीक्षक संजय पवार, मुकादम आनंद वळंजू, सफाई कामगार मयूर आचरेकर, धीरज आचरेकर, साक्षी जंगम, ट्रॅक्टर चालक सावळा मानवर, यांनी स्वच्छता अभियानामध्ये भाग घेतला. तसेच मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेब यांनी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिला.
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने मालवण मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांचे व स्वच्छता अभियानामध्ये सहभागी नागरिकांचे आभार मानण्यात आले

