मनसे शहराध्यक्ष सागर जाधव यांची माहिती
मालवण : दांडी येथील महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड यांच्या मनमानी कारभारामुळे दांडी बीच ते किल्ला होती वाहतूक अचानक बंद केल्यामुळे अनेक पर्यटन व्यावसायिक जे होडी व्यवसाय करत होते त्यांच्या पोटावर पाय आणण्याचे काम हे संबंधित विभागाकडून केल्याचे दिसत आहे. गेली दोन वर्षे विना अपघात सेवा सुरू असताना अचानक अशी कोणती उपरती अधिकाऱ्याना झाली? की ज्यामुळे ही होडी सेवा बंद करावी लागली? आणि अधिकाऱ्यांनी वेळोवेळी खोटी आश्वासने देऊन पर्यटन व्यावसायिकांची फसवणूक केली आहे. आणि असे अधिकारी पर्यटन व्यावसायिकांचा आर्थिक ह्रास करून देशोधडीला लावण्याचे काम करत आहेत. २०१६ मध्ये या वाहतुकीला परवानगी देण्यात आली होती त्यानंतर फ्लोटिंग जेटी देण्याचे आश्वासन अशा एक ना अनेक गोष्टींचा विसर बहुतेक अधिकाऱ्यांना पडलेला दिसतोय. आणि याची आठवण करून देण्याची आता वेळ आली आहे.
अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात जो उपोषणचा बडगा स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी उभारला आहे, त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पूर्ण पाठिंबा राहील असे मनसे शहराध्यक्ष श्री सागर जाधव यांनी सांगितले. जोपर्यंत स्थानिक व्यवसायिकाना न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायम त्यांच्या पाठीशी असेल

