मनसे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांची मनसेच्या वतीने मागणी
मालवण : मालवण तालुक्यातील गोळवण कुमामे डिकवल ग्रामपंचायत सध्या बोगस घरपत्रक उतारा प्रकरणावरून जोरदार चर्चेत आहे. गेली अनेक वर्षे एकच व्यक्ती सरपंच म्हणून राहिलेले विद्यमान सरपंच यांचा साळसुदपणाचा बुरखा यानिमित्ताने फाटला गेल्याचे दिसून येत आहे. आज एक प्रकरण बाहेर येताच “तो मी नव्हेच” अशी आव आणणारे सरपंच यांनी अनेक वर्षे पदावर राहिलेले असताना किती बोगस कामे केली असतील हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे? आपलाच एक माणूस आमच्या वेळोवेळी धाऊन येणारा अडीअडचणीत साथ देणारा म्हणून ओळख असलेला माणूस आज बनावट घरपत्रक उताऱ्यामुळे चर्चेत आला आहे. लोकांचा विश्वास संपादन करून मागील कित्येक वर्षात पद उपभोगत असताना नक्की किती घोटाळा केला असेल याची चौकशी सुद्धा शासन स्तरावर व्हावी अशी प्रमुख मागणी मनसेच्या वतीने करण्यात येत आहे.
याची गंभीर दखल घेऊन जर शासनाने याची चौकशी केल्यास गेल्या अनेक वर्षातील घोटाळे समोर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यासंदर्भात लवकरच मनसेचे पदाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग तसेच पालकमंत्री यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करुन योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी करणार असल्याचे मनसे उपजिल्हाध्यक्ष श्री गणेश वाईरकर यांनी सांगितले.

